Homeलातूर‘नीट’ परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा

‘नीट’ परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा

लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) १० मे २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकाचा संदर्भ देत, नीट(युजी) २०२६ परीक्षेबाबत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. परीक्षेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता जपण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे २०२६ रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चूराडा झाला आहे. लातूरमधील विद्यार्थ्यांनी एकुणच व्यवस्थेवर संताप व्यक्त केला तर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
देशातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांनी यंदा ३ मे २०२६ रोजी नीटची परीक्षा दिली होती, लातूरमधील हजारो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांकडून मिळालेल्या गोपनीय अहवालांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. ३ मे रोजी झालेल्या परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता उरली नसल्याचे आणि परीक्षेची गोपनीयता भंग झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. परीक्षेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी ही परीक्षा रद्द करणे आवश्यक असल्याचे ‘एनटीए’ने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी(एनटीए)च्या या निर्णयामुळे लातूरमधील हजारो विद्यार्थी, विद्यार्थीनींमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे तर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नीटच्या परीक्षेता २५ ते २६ लाख विद्यार्थी असतात आणि तितकेच पालकही. या सर्वांची आता घोर निराशा झाली आहे.  पुन्हा परिक्षा घेणे योग्य नाही. पुन्हा  क्लास लावावा लागेल, पुन्हा क्लाससाठी लातूरला यावे लागेल. ज्यांचा स्कोअर चांगला येण्याची अपेक्षा आहे, त्यांच्या स्वप्नांचे काय?, आता नव्याने कटऑफ किती येईल?, असा प्रश्नांचा भडीमार विद्यार्थी करीत  आहेत.  यंत्रणेच्या दुर्लक्षाची शिक्षा विद्यार्थ्यांना का?, असा प्रश्न उपस्थित करुन एक विद्यार्थी म्हणाला, आमच्या भवितव्याशी खेळ का?, प्रत्येक वेळी पेपर माफिया डोकेवर काढतो आणि त्याची शिक्षा विद्यार्थ्यांना भोगावी लागत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR