लातूर कनेक्शन, प्रा. कुलकर्णी पेपरफुटीचा सूत्रधार?
कसून चौकशीनंतर
सीबीआयची कारवाई
मुंबई : प्रतिनिधी
नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने कारवाईचा धडाका सुरू केला असून, लातूरमधून ताब्यात घेतलेल्या निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णीला सखोल चौकशीनंतर आज पुण्यात अटक करण्यात आली. चौकशीतून तो एनटीएशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. आता पुढील चौकशीसाठी त्याला दिल्लीला हलविल्याची माहिती आहे. दरम्यान, याच प्रकरणात लातूरमधील आरसीसीचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांची आज ८ तास कसून चौकशी करण्यात आली असून, पुणे, पिंपरी चिंचवडमधील त्यांच्या कार्यालयात धाडी टाकून तपास करण्यात आला. आता नीट पेपरफुटीत लातूर कनेक्शन समोर येत असल्याने खळबळ उडाली आहे.
नीट पेपरफुटीच्या प्रकरणात आतापर्यंत अनेक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पण त्याचा सूत्रधार सीबीआयच्या ताब्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पी. व्ही. कुलकर्णी केमिस्ट्रीचा निवृत्त प्राध्यापक असून एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित आहे. तो मूळचा लातूरचा असून, यासंबंधीच्या चौकशीसाठी त्याला गुरुवारी सीबीआयने लातुरातून ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील पुण्यातील आरोपी मनीषा वाघमारेच्या चौकशीतून सीबीआय प्रा. कुलकर्णीपर्यंत पोहोचली. त्यामुळे त्यालाही पुण्यात आणले आणि सखोल चौकशीनंतर शुक्रवारी त्याला अटक केली.
सीबीआयच्या माहितीनुसार एप्रिल २०२६ च्या अखेरच्या आठवड्यात कुलकर्णीने आरोपी मनीषा वाघमारेच्या मदतीने विद्यार्थी गोळा केले. त्यानंतर त्याने पुण्यातील स्वत:च्या घरी स्पेशल कोचिंग क्लास घेतले आणि क्लासमध्येच विद्यार्थ्यांना परीक्षेत येणारे प्रश्न, त्यांचे पर्याय आणि योग्य उत्तरे सांगितल्याचे समजते. सीबीआयला मिळालेल्या माहितीच्या आधारे लातूरमध्ये झालेल्या तपास आणि चौकशीनंतर पी. व्ही. कुलकर्णीला काल ताब्यात घेतले होते. पुण्यात त्याची सखोल चौकशी केल्यानंतर आज अटक करून दिल्लीला नेल्याचे समजते.
प्रा. पी. व्ही. कुलकर्णी हा लातूरमध्ये प्राध्यापक होता. चार वर्षांपूर्वी तो सेवानिवृत्त झाला. पुण्यात ब्युटी पार्लर चालवणा-या मनीषा वाघमारेच्या तो संपर्कात आला. याच धाग्यावरून सीबीआयचे पथक लातूरपर्यंत पोहोचले. लातूरमधील कैलासनगर येथील कुलकर्णीच्या घराला सध्या कुलूप आहे. दरम्यान, सीबीआयचे पथक लातुरात ठाण मांडून बसले असून, या पथकाने शुक्रवारी सकाळपासून लातूरमधील आरसीसी या खाजगी क्लासेसचे प्रमुख प्रा. शिवराज मोटेगावकर यांचीही तब्बल ८ तास कसून चौकशी केली. यासोबतच त्यांच्या पुणे, पिंपरी-चिंचवड येथील कार्यालयातही छापे टाकून कागदपत्रे ताब्यात घेतली. सीबीआयने गेल्या २४ तासांत देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. या दरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईल जप्त केली असून, या वस्तूंचा तांत्रिक आणि फॉरेन्सिक तपास सुरु आहे.
२१ मे रोजी होणार
नीटची फेरपरीक्षा
३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेलापेपरफुटीचे ग्रहण लागल्याने जवळपास २३ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. त्यातच आता केंद्र सरकारने २१ जून रोजी पुनर्परीक्षा घेण्याची घोषणा केली. यावेळी विद्यार्थ्यांना १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार असल्याचेही केंद्रीय शिक्षमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.
परीक्षेचे शुल्क परत करणार
रद्द झालेल्या परीक्षेचे शुल्क विद्यार्थ्यांना परत दिले जाणार असून नव्याने होणा-या परीक्षेसाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना कोणतेही परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच पुढील वर्षापासून नीट परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याचेही धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.
आतापर्यंत ७ जणांना अटक
सीबीआयने नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक केली. यामध्ये राजस्थानच्या मंगीलाल बिनवाल, जामवारामगडचा त्याचा भाऊ दिनेश बिनवाल, मुलगा विकास बिनवाल, हरियाणाच्या गुरुग्रामचा यश यादव आणि नाशिकचा शुभम खैरनार यांचा समावेश आहे. या आरोपींना दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सर्व आरोपींना ७ दिवसांची कोठडी सुनावली. याशिवाय पुण्यातून ब्युटिशियन मनीषा वाघमारे आणि नाशिकमधून धनंजय लोखंडे यांनाही अटक केली आहे.
प्रा. मोटेगावकर यांची कसून चौकशी
लातूर : शहरातील रेणूकाई केमिस्ट्री क्लासेस (आरसीसी)चे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या निवासस्थानी दि. १५ मे रोजी सकाळी ७ च्या सुमारास सीबीआयचे पथक पोहोचले. या पथकाने नीट-२०२६ पेपर फुटीप्रकरणी प्रा. मोटेगावकर यांची तब्बल ८ तास कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान सीबीआयने काही पुरावेही जप्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ८ तासांनंतर सीबीआयच्या पथकाने त्यांचे घर सोडले.
नीट-२०२६ पेपर फुटीप्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचे पथक गेली २ दिवस लातूर शहरात आहे. गुरुवारी या पथकाने सेवानिवृत्त प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांना ताब्यात घेतले होते. आता त्याला अटक करण्यात आली. त्यातच शुक्रवारी सकाळी शहरातील सूतमील परिसरातील प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या निवासस्थानी सीबीआयच्या ८ अधिका-यांचे पथक पोहोचले. त्यांनी पेपर फुटीप्रकरणी प्रा. शिवराज मोटेगावकर यांची कसून चौकशी केली. याचदरम्यान सीबीआयच्या काही अधिका-यांनी रेणूकाई केमिस्ट्री क्लासेस (आरसीसी) लाही जाऊन तेथेही चौकशी केली.
बँकेच्या अधिका-यांनाही
बोलावून केली चौकशी
प्रा. मोटेगावकर यांच्या चौकशीदरम्यान सीबीआयच्या पथकाने एका नामांकित बँकेच्या अधिका-यांनाही प्रा. मोटेगावकर यांच्या घरी बोलावून घेत बँकेचे व्यवहार व इतर कागदपत्रांची तपासणी केली. प्रा. मोटेगावकर यांचा मोबाईल फोन, संगणक, कागदपत्रांचीही तपासणी सीबीआयच्या पथकाने केली.

