लातूर : प्रतिनिधी
शहरातील दहा वर्षांची कन्या ओजस्वी राहुल सुळ हिने आपल्या अद्वितीय कौशल्याच्या जोरावर ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदवत लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. हुलाहूप या कौशल्यप्रकारात तिने तब्बल १ तास ४२ मिनिटे १८ सेकंद अखंडपणे विविध प्रकारचे बदल करत रिंग खाली न पडू देता हा विक्रम आपल्या नावे केला आहे.
या विक्रमासाठी मोठ्या प्रमाणात कौशल्य, एकाग्रता, संयम, शारीरिक संतुलन आणि स्टॅमिना आवश्यक असतो. ओजस्वीने अतिशय आत्मविश्वासाने आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हा पराक्रम साध्य केला आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीची अधिकृत नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे. ओजस्वी ही लातूर येथील डॉ. ज्योती सुळ आणि डॉ. राहुल सुळ या दांपत्यांची कन्या असून, तिच्या यशामुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, ओजस्वीची पुढील वाटचाल आता ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’कडे सुरू झाली असून, आणखी मोठा विश्वविक्रम आपल्या नावे करण्यासाठी ती जोरदार तयारी करत आहे. तिच्या या जिद्दीला आणि मेहनतीला भविष्यात जागतिक स्तरावरही मोठे यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
















