लातूर : प्रतिनिधी
नीट-२०२६ परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करणारे निवेदन मंगळवार दि. १९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, नीट-२०२६ पेपरफुटी प्रकरणाची चौकशी सध्या सीबीआयमार्फत सुरू असून विद्यार्थ्यांमध्ये भीती, नैराश्य आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बाधित विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करून त्यांच्या शैक्षणिक व मानसिक नुकसानभरपाईसाठी विशेष योजना जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच नीट परीक्षा घेणारी ‘एनटीए’ समिती तात्काळ बरखास्त करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. पेपरफुटीमुळे मानसिक तणावाखाली गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी तातडीने समुपदेशन केंद्र सुरू करावे, तसेच शासनामार्फत स्वतंत्र टोल-फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यासोबतच प्रा. शिवराज मोटेगावकर संचालित आरसीसी क्लासमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क परतावा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात दोषी आढळणा-या क्लासेसवर कायमस्वरूपी बंदी घालून संबंधित गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.
‘स्पेशल बॅच’मधून कोट्यवधींची माया
रेणूकाई केमिस्ट्री क्लासेस (आरसीसी) च्या सर्वच शाखांमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला असायचा. या सर्वच शाखांमध्ये ५० विद्यार्थ्यांची ‘स्पेशल बॅच’असायची. हे ५० विद्यार्थी म्हणजे नामांकीत डॉक्टरांची पाल्य होत. ‘स्पेशल बॅच’मध्ये या पाल्यांची शिकवणी चालायची. टोलेजंग हॉस्पिटल चालवायला आपला वारस डॉक्टरच झाला पाहिजे, हे त्यामागचे भविष्याचे गणित. इतर बॅचेसमध्ये सर्वसामान्य पालकांचे २००-२०० पाल्य कोंबून क्लास चालायचा. सामान्यांच्या पाल्यांना विषयाचे आकलन होवो की न होवो त्यांनी फक्त क्लासची फिस भरायची, अशी एकंदरीत आरसीसीच्या क्लासेसची पद्धत होती.
मोटेगावकर, कुलकर्णी यांच्या विरोधात मनसेचे अंडा फेक आंदोलन
नीट पेपर फुटी प्रकणातील मुख्य सुत्रधार आरसीसी क्लासेसचा संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर आणि एनटीएच सदस्य प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांच्या विरोधात मनसेचे अंडा फेक व निदर्शने आंदोलन केले. लाखों विद्यार्थ्यांचे नुकसान या पेपर फुटीमुळे झाले असून महाराष्ट्रमध्ये ४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या क्लासमधील हजारो विद्यार्थ्यांची फीस परत मिळावी, अशी मागणी केली आहे. यावेळी किरण चव्हाण, भागवत शिंदे, मनोज अभंगे, वाहेदभाई शेख, ल् बजरंग ठाकूर, अनिल जाधव, जहांगीर शेख, सय्यद सरफराज, ध्रुव महापूरकर, रवी पांचाळ, इंद्रजीत माने, गफ्फार शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक
नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या आरसीसी क्लासेसचा संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने अटक केल्यानंतर विविध स्तरातून शिवराज मोटेगावकर याचा निषेध होत आहे. याप्रकारणी आता अखिल भारतीय विध्यार्थी परिषददेखील आक्रमक झाली असून अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेच्या वतीने आरसीसी क्लासेस सामोर निषेध आंदोलन करून संताप व्यक्त करण्यात आला. तर राज्यभरातील शिवराज मोटेगावकरचे क्लासेस तात्काळ बंद करण्यात यावेत अन्यथा अखिल भारतीय विध्यार्थी परिषद राज्यभर मोटेगावकर क्लासेस समोर तीव्र आंदोलन करेल, असा इशारादेखील यावेळी देण्यात आला. नीट पेपरफुटी प्रकरणात प्रा. मोटेगावकर यांचे नाव आल्यानंतर पालकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.
औसा रोड सीबीआयच्या रडारवर
नीट पेपरफुटीनंतर सीबीआय लातूर शहरात तळ ठोकून आहे. या प्रकरणाशी संबंधीत सर्वच बारीक-सारीक गोष्टीची सीबीआयकडून कसुन चौकशी केली जात आहे. मंगळवारी सीबीआयच्या रडावर औसा रोडवरील काही डॉक्टर होते. औसा रोडवरील एका बालरोगतज्ज्ञाची सीबीआयकडून रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरु होती. नीट पेपर फुटीप्रकरणी या डॉक्टरांचा काही संबंध आहे काय?, याची चौकशी केल्याची माहिती विश्वासनीय सुत्रांनी दिली.
















