पुणे: नीट (NEET-UG 2026) पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी आणि ‘आरसीसी’ (RCC) क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या अडचणीत आता प्रचंड वाढ झाली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) अटकेनंतर आता पुणे महानगरपालिकेने (PMC) मोटेगावकर यांच्या मालमत्तांवर अत्यंत कडक आणि तडकाफडकी कारवाई केली आहे. पुण्याच्या जंगली महाराज (JM) रोड आणि डेक्कन परिसरातील आरसीसी क्लासेसच्या इमारतीवर पालिकेने थेट बुलडोझर चालवला असून, बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त करत संपूर्ण कॅम्पस सील केला आहे.
३ कोटी २० लाखांचा कर बुडवला; अनधिकृत बांधकाम उघड
पुणे महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ज्या इमारतीमध्ये आरसीसी क्लासेस सुरू होते, त्या इमारतीला पालिकेचे भोगवटा पत्र (Occupancy Certificate – OC) आणि काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र (Completion Certificate – CC) मिळालेले नव्हते. तरीही नियमांचे उल्लंघन करून गेल्या चार वर्षांपासून तिथे क्लासेस चालवले जात होते. याशिवाय, या मालमत्तेवर तब्बल ३ कोटी २० लाख रुपयांचा मिळकत कर (Property Tax) थकलेला होता. वारंवार नोटिसा देऊनही हा कर भरला गेला नव्हता. या इमारतीत अनधिकृत शेड उभारणे, बेकायदेशीर पार्किंग बदल करणे आणि अतिरिक्त मजले बांधल्याचे तपासणीत समोर आले.
मनसेचे आंदोलन आणि पालिकेची तत्परता
आरसीसी क्लासेसच्या या बेकायदेशीर कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुण्यात आक्रमक पवित्रा घेतला होता. मनसे कार्यकर्त्यांनी क्लासेसच्या बोर्डला काळं फासून जोरदार घोषणाबाजी केली होती. मनसे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन अनधिकृत बांधकामावर आणि कर चुकवेगिरीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात ही मोठी कारवाई केली.
शिवराज मोटेगावकर हा लातूरमधील प्रसिद्ध ‘RCC कोचिंग इन्स्टिट्यूट’चा संचालक आहे. ३ मे रोजी झालेल्या ‘नीट-युजी २०२६’ परीक्षेचा केमिस्ट्रीचा पेपर लीक करण्यात त्याचा थेट सहभाग असल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. सीबीआयने त्याच्या मोबाईलमधून लीक झालेली प्रश्नपत्रिका जप्त केली असून, सध्या तो दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाच्या आदेशानुसार ९ दिवसांच्या सीबीआय कोठडीत आहे. या पेपरफुटीमुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) परीक्षा रद्द केली असून, आता ही परीक्षा २१ जून रोजी पुन्हा घेतली जाणार आहे. या तडकाफडकी कारवाईमुळे पुणे आणि लातूरमधील शैक्षणिक वर्तुळात तसेच इतर बड्या कोचिंग क्लासेस चालकांमध्ये प्रचंड खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे.
















