नांदेड : प्रतिनिधी
अवघ्या दोनच दिवसांपुर्वी सांगवी पुलाजवळ युवकाचा खून झाला होता. यानंतर शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसर खुनाच्या घटनेने हादरला आहे. येथे एका अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही हत्या १३ जुलै रोजी मध्यरात्री करण्यात आली. याप्रकरणी २ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात १३ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास सागर सुभाष केळकर, अविनाश इंगोले व शुभम इंगोले यांचे भांडण झाले होते. त्यामुळे ते बसस्थानकातील पोलीस चौकीमध्ये गेले होते. तेथून त्यांना हाकलून दिल्यानंतर बसस्थानका जवळील बोळीत गेले होते. यावेळी आरोपी अविनाश इंगोले व शुभम इंगोले यांनी सागर सुभाष केळकर (वय १७) याच्या पोटात आणि तोंडावर चाकूने अनेक वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सागर केळकरचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अविनाश इंगोले व शुभम इंगोले या दोन्ही मारेक-यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी तक्रारीवरून वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसस्थानक परिसरालगत एका अल्पवयीन मुलाचा असा निर्घृण खून झाल्याने खळबळ माजली आहे.
















