काठमांडू : नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाची ठिणगी पडली आहे. बेरोजगारीविरुद्ध जेन-झी पुन्हा रस्त्यांवर उतरली आहे. गेल्या तीन दिवसांत तीन तरुणांनी स्वत:वर पेट्रोल शिंपडून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे. आंदोलनकर्त्यांकडून पंतप्रधान बालेन शाह यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली आहे.
राजधानी काठमांडूमध्ये तरुणांची निदर्शने सुरू आहेत. यावरून विरोधी पक्षाने नेपाळी काँग्रेसने सरकारवर तरुणांमध्ये आशा आणि विश्वास निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. जेन-झी नेपाळ संघटनेने पंतप्रधान बालेन शाह यांच्यावर जनविरोधी आणि निरंकुश पद्धतीने शासन चालवल्याचा आरोप केला आहे. संघटनेचे म्हणणे आहे की अर्थसंकल्प आणि धोरणांमध्ये तरुणांचा रोजगार आणि उत्पन्न वाढवण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही.
नेपाळमध्ये अशा घटना सातत्याने घडत आहेत. यावरून तरुणांची मानसिक स्थिती, बेरोजगारी आणि सरकारी धोरणांबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. जर सरकारने लवकर प्रभावी पावले उचलली नाहीत तर विरोध अधिक तीव्र होऊ शकतो, असे राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे मत आहे. ५ मार्च रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बालेन शाह यांच्या पक्षाने मोठा विजय मिळवला. त्यामुळे नेपाळच्या पारंपरिक राजकारणाला मोठा धक्का बसला. बालेन शाह यांनी झापा-५ मतदारसंघातून माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा पराभव करून आपली राजकीय ताकद सिद्ध केली. ३५ वर्षांच्या वयात पंतप्रधानपद स्वीकारताच ते नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत.
सरकारचे अपयश
२०२३ साली नेपाळमध्ये जेन-झींचे मोठे आंदोलन झाले होते. आंदोलनकर्त्यांनी ९ सप्टेंबर रोजी संसद भवनावर कब्जा केला होता. त्यांनी सुरक्षा कर्मचा-यांची शस्त्रही लुटली होती. या निदर्शनांमध्ये ७७ लोकांचा मृत्यू झाला होता आणि यामागे सोशल मीडियावर बंदी, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि मंद अर्थव्यवस्था याबद्दल लोकांचा संताप होता. त्यावेळी काठमांडूचे महापौर असलेले बालेन शाह यांनी याला राज्याचे मोठे अपयश म्हटले होते, मात्र आता सध्याच्या घटनांवर त्यांनी मौन पाळले आहे. ते विरोधक आणि आंदोलकांच्या निशाण्यावर आले आहेत.
















