पुणे : प्रतिनिधी
महायुतीचे चर्चेचे गु-हाळ सुरू असतानाच महाविकास आघाडीत कॉंग्रेसने अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी अदिती पोहरेंना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवाजी शिक्षण संस्थेचे शिवाजीराव देशमुख यांची मुलगी आणि देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांची सून आदिती पोहरेंना उमेदवारी जाहीर झाल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले. मुंबईतील टिळक भवन येथे अदिती ऋषिकेश पोहरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली. दुसरीकडे विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीचा फॉर्म्युला ३-१-१ असा ठरल्याची माहिती आहे.
पुणे शिक्षक जागेवर भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे ही जागा कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संभाजीनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे, अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाकडे, नागपूर पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपकडे आणि पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपाकडे जाण्याची शक्यता आहे. पुणे शिक्षकवरून महायुतीत घोडं अडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.















