Homeमहाराष्ट्र८ हजार कोटींची बिले मार्गी लागणार

८ हजार कोटींची बिले मार्गी लागणार

कंत्राटदारांना दिलासा मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची मोठी घोषणा

पुणे : राज्यातील कंत्राटदारांची बांधकाम विभागाकडे १८ हजार कोटींची बिले अदा करणे बाकी आहे. ती बिले येत्या दोन ते चार महिन्यांत अदा होतील, असे बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच यापुढे आता रस्ते बांधणी करताना थीम समोर ठेवूनच रस्ते बांधणी केली जाईल, मागेल तेथे रस्ते होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच भोसले यांनी मराठवाडा प्रादेशिक विभागाचा आढावा येथे येऊन घेतला. यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले, आपले खाते सध्या प्रचंड देण्यांमध्ये दबलेले आहे. त्यावर ते म्हणाले, १८ हजार कोटींची देणी आहे. सरकारच्या मानाने ती काही जास्त नाही. लवकरच ती देणीदेखील अदा होतील. सार्वजनिक बांधकाम विभागाचा आकडा १८ हजार कोटींचा असून इतर विभागाची देणीदेखील बांधकाम विभागाच्या माथ्यावर मारली जात असल्यामुळे आकडा जास्त आहे. प्रलंबित देयकांसाठी टप्प्याटप्प्याने तरतूद येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवर अखंड उड्डाणपूल बांधण्याचा समावेश बजेटमध्ये केला आहे. त्याबाबत मंत्री भोसले म्हणाले, ते काम आमच्याकडे आलेले नाही. युडी किंवा एमएसआरडीसीकडे असेल. शेंद्रा ते बिडकीन रस्त्याचे काम बांधकाम विभाग करणार आहे. त्यासाठी बजेट, भूसंपादनाची तरतूद केली आहे. तसेच संभाजीनगर ते शिरूर रस्त्याचे काम होत आहे. अहिल्यानगर ते पुणे वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्राधान्य असणार आहे.

हायब्रीड अ‍ॅन्युटीचा अहवाल मागविला
एमएसआयडीसी आणि बांधकाम विभाग यांच्यातील कामांच्या गुणवत्तेबाबत तडजोड होणार नाही. दक्षता विभागाकडून हॅम वन, हॅम टू (हायब्रीड अ‍ॅन्युटी मॉडेल) मधील कामांचा अहवाल मागविला आहे. एक महिन्याच्या आत त्याचा अहवाल येणार आहे. काही कामे अपूर्ण आहेत, त्याची कारणे अहवालानंतर समोर येतील. कंत्राटदारांनासुद्धा दर्जाबाबत तडजोड करता येणार नाही. एमएसआयडीसीच्या कामांवर करडी नजर असल्याचेही भोसले यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR