नाशिक : नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचा-यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्यावर आता कंपनीने मोठी कारवाई केली आहे. कंपनीने निदा खानला तात्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित केले असून तसे अधिकृत पत्र जारी केले आहे.
संबंधित कंपनीचे हे पत्र ९ एप्रिल रोजीचे असल्याची माहिती समोर आली आहे. निदा खान हिला पाठवलेल्या निलंबन पत्रात अत्यंत कडक शब्दांत सूचना दिल्या आहेत. तुमच्याविरुद्ध एक अत्यंत गंभीर प्रकरण नोंदवले गेल्याची माहिती कंपनीला मिळाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता व्यवस्थापनाने तुम्हाला तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
निलंबनासोबतच निदा खानचा कंपनीच्या अंतर्गत नेटवर्कवरील प्रवेश तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. तसेच, कंपनीच्या कोणत्याही कार्यालयात किंवा घरून काम करण्यासही मनाई करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत इतर कोणत्याही कर्मचा-याशी चर्चा करू नये आणि कडक गोपनीयता पाळावी, असे निर्देशही कंपनीने दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास अधिक कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा पत्रात देण्यात आला आहे.
का झाली कारवाई?
निदा खान ही संबंधित कंपनीत प्रोसेस असोसिएट म्हणून कार्यरत होती. मात्र, तिच्यावर हिंदू तरुणींना धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे, त्यांना टार्गेट करणे आणि विरोध करणा-यांचा मानसिक व लैंगिक छळ करण्यासाठी चिथावणी दिल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडलेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने, कंपनीने आपली प्रतिमा जपण्यासाठी आणि तपासात सहकार्य करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
निदा खान अद्याप फरारच
एकीकडे कंपनीने निलंबनाची कारवाई केली असली, तरी दुसरीकडे मुख्य संशयित निदा खान गेल्या २१ दिवसांपासून फरार आहे. तिने अटक टाळण्यासाठी वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू केली आहे. नाशिक पोलिसांचे विशेष तपास पथक तिचा कसून शोध घेत असून, मुंबई, पुणे आणि भिवंडी परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.

