परभणी : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्यासाठी दि. १७ ते २० एप्रिल या चार दिवसांकरीता येलो अलर्ट जारी केला आहे. दि. १७ एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून दि. १८ एप्रिल रोजीही उष्मालाट राहण्याची शक्यता आहे. दि. १९ व २० एप्रिल रोजी जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वा-यांसह विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविली आहे.
जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. दुपारी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, डोक्यावर टोपी/ओढणी वापरावी, हलके, सैल कपडे परिधान करावेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींनी विशेष दक्षता घ्यावी. उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
उष्मालाटेत घ्यावयाची काळजी
तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या. गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्रवपदार्थ घ्यावेत. ओआरएस, लिंबूपाणी, ताक, लस्सी, कैरीचे पन्हे, नारळपाणी यांसारखे द्रवपदार्थ घ्या. दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर जाणे टाळावे. अशक्तपणा, चक्कर, डोकेदुखी जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा अनुराधा ढालकरी यांनी कळविले आहे.
















