नांदेड : प्रतिनिधी
शहरात अनाधिकृतरित्या जाहिरात बॅनरबाजी करणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. शहरातील शासकीय विश्रामगृह ते पावडेवाडी नाका या मुख्य रस्त्यावर विनापरवानगी बॅनर लावल्याने चेन्नई मॉलच्या व्यवस्थापकावर तर कौठा भागात बॉम्बशोधक पथक कार्यालयासमोर बॅनर लावल्याप्रकरणी एका बांधकाम व्यवसायीकावर महापालिकेने थेट गुन्हा दाखल केला आहे.
फुले मार्केट परिसरातील चेन्नई मॉलच्या विविध सूट योजनांचे बॅनर शहरातील काही भागात लावण्यात आले आहेत. शहरातील मुख्य रस्त्यावर शासकीय विश्रामगृह पावडेवाडी नाका येथे हे बॅनर निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणात महापालिकेचे इमारत निरीक्षक भरत शिवपुरे यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ भिसे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
तर नवीन नांदेडमध्ये कौठा भागात बॉम्बशोधक पथक कार्यालयासमोर स्वप्न सृष्टी या बांधकाम व्यावसायिकानेही मुख्य रस्त्यावरच बॅनर लावले होते. हा प्रकार लक्षात येताच महापालिकेचे इमारत निरीक्षक किशन डुकरे यांनी या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ मुसळे हे करत आहेत. शहरात कोणीही विनापरवानगी बॅनर लावू नये, बॅनर लावल्यास कठोर कारवाईचा इशारा महापालिकेचे आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे, उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी दिला आहे.
















