30.4 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeधाराशिवधाराशिवमध्ये विकासकामांची चर्चा कोसो दूर

धाराशिवमध्ये विकासकामांची चर्चा कोसो दूर

निवडणूक देशाची, प्रचारात वैयक्तिक चिखलफेक कोणीही निवडून आले तरी घरातच खासदारकी

 धाराशिव : सुभाष कदम
धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार तथा ठाकरे शिवसेनेचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर अशी थेट लढत होत आहे. या दोघांपैकी कोणीही निवडून आले तरी खासदारकी ही एकाच घरात राहणार आहे. कारण ओमराजे व अर्चनाताई पाटील हे नात्याने दीर-भावजय आहेत. लोकसभेची निवडणूक ही देशाची निवडणूक असते. यामध्ये महायुती व महाविकास आघाडी यांच्या सरकारच्या काळात झालेल्या विकासकामांची चर्चा होणे अपेक्षित आहे. परंतु, तसे न होता हे दोघे उमेदवार व त्यांचे नेते वैयक्तिक पातळीवर टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे या धाराशिव मतदारसंघात विकासकामांचा मुद्दा कोसो दूर राहिला आहे.

महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचे सासरे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचे वडील कै. पवनराजे निंबाळकर हे दोघे सख्खे चुलत भाऊ होते. डॉ. पाटील हे मूळचे निंबाळकर पण त्यांचे वडील बाजीराव पाटील हे तेर येथील फंड-पाटील यांच्या घराण्यात दत्तक गेल्याने त्यांचे आडनाव पाटील झाले. अर्चनाताईंचे पती भाजपाचे आ. राणाजगजितसिंह पाटील व ओमराजे हे नात्याने सख्खे चुलत भाऊ आहेत. कै. पवनराजे निंबाळकर यांची सुपारी देऊन हत्या केल्याचा आरोप डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. पवनराजे यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे थोरले पुत्र ओमराजे यांना जनतेने लहान वयातच राजकारणात आणले.

सहानुभूतीच्या लाटेत त्यांनी २००९ मध्ये कळंब-उस्मानाबाद मतदारसंघातून राणाजगजितसिंह पाटील यांच्या विरोधात निवडणूक जिंकली व आमदार झाले. पुढे २०१९ मध्ये ते राणा पाटील यांच्या विरोधात मोदी लाटेत लोकसभा निवडणूक लढवून खासदार झाले. राणा पाटील विरुद्ध ओमराजे असा, कोणत्याही निवडणुकीत सामना रंगला की, दोघांनीही केलेल्या विकासकामांची चर्चा होत नाही. पवनराजे हत्याकांड व वैयक्तिक पातळीवर टीका होते. २०२४ च्या निवडणुकीतही प्रचारामध्ये विकासाचा मुद्दा लांबच राहिला आहे. या दोघांकडूनही भावकीच्या भांडणाप्रमाणे दरवेळेसप्रमाणे तोच-तोच मुद्दा येत आहे. एकमात्र खरे या दोघांपैकी कोणीही निवडून आले तरी जिल्ह्याची खासदारकी एकाच घरात राहणार आहे. निष्ठावंत नेते, कार्यकर्त्यांना आयुष्यभर सतरंज्या उचलायचे काम करावे लागणार आहे.

धाराशिव जिल्ह्याची राजधानी तेर-गोवर्धनवाडी
माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे गाव धाराशिव तालुक्यातील तेर हे असून त्यांनी जिल्ह्यावर ४० वर्षे निर्विवाद सत्ता गाजविली. त्यामुळे राजकीय भाषेत तेर गावाला धाराशिव जिल्ह्याची राजधानी संबोधले जाते. त्यांच्यानंतर पुन्हा जिल्ह्याची सूत्रे त्यांचे सुपुत्र आ. राणा पाटील यांच्याकडे गेली आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांचे गाव धाराशिव तालुक्यातील गोवर्धनवाडी हे आहे. तेर-गोवर्धनवाडी या दोन्ही गावांतील अंतर फक्त ४ किलोमीटर आहे. सत्ता पाटील किंवा राजेनिंबाळकर घराण्याकडे गेली तरी जिल्ह्याची राजधानी तेर किंवा गोवर्धनवाडी राहणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR