Homeअंतरराष्ट्रीयहाताने शिवून बनवलेले कौंडिन्य जहाज भारतातून ओमानला पोहोचले

हाताने शिवून बनवलेले कौंडिन्य जहाज भारतातून ओमानला पोहोचले

२००० वर्षांपूर्वीच्या तंत्रज्ञानाने बनविण्यात आले जहाज १८ दिवसांत पार केला विक्रमी टप्पा

नवी दिल्ली : भारतात हाताने शिवून तयार केलेले पारंपरिक जहाज आयएनएसव्ही ‘कौंडिन्य’ने १८ दिवसांच्या सागरी प्रवासानंतर ओमानमधील मस्कट येथे पोहोचून आपला ऐतिहासिक प्रवास पूर्ण केला. बुधवारी जहाजाच्या मस्कट किना-याजवळ पोहोचल्याची पुष्टी झाली.

जहाजावर कमांडर विकास श्योराण यांच्या नेतृत्वाखाली १६ सदस्यीय पथक होते. कौंडिन्य २९ डिसेंबर २०२५ रोजी गुजरातच्या पोरबंदर येथून आपल्या पहिल्या परदेशी प्रवासासाठी रवाना झाले होते. हा प्रवास साधारणपणे १५ दिवसांत पूर्ण होणार होता. मात्र, त्याला १८ दिवस लागले. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सान्याल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर याची माहिती दिली. त्यांनी स्किपर कमांडर विकास श्योराण आणि मोहीम प्रमुख हेमंत कुमार यांच्यासोबत एक फोटो पोस्ट करत लिहिले या क्षणाचा आनंद घेत आहोत आम्ही करून दाखवले.

क्रू मेंबर म्हणाले गुड मॉर्निंग इंडिया, मस्कट दिसले
जहाजावरील आणखी एका क्रू सदस्य हेमंतने पोस्ट केले लँड अहोय! मस्कट दिसले. गुड मॉर्निंग इंडिया, गुड मॉर्निंग ओमान. समुद्री मार्गाने न थांबता एकट्याने जगाची परिक्रमा करणारे पहिले भारतीय, निवृत्त नौदल कमांडर अभिलाष टॉमी यांनीही कौंडिन्यच्या टीमचे अभिनंदन केले.

कौंडिन्यची रचना अजिंठा लेण्यांमधील एका चित्रावर आधारित
आयएनएसव्ही ‘कौंडिन्य’ची रचना अजिंठा लेण्यांमधील ५ व्या शतकातील एका चित्रावर आधारित आहे. गोव्यातील एका कंपनीने सुमारे २००० वर्षांपूर्वीच्या टाका पद्धतीचा वापर करून या जहाजाची निर्मिती केली आहे. लाकडी फळ्यांपासून बनवलेले हे जहाज नारळाच्या तंतूंनी शिवले आहे. यात कुठेही खिळ्यांचा वापर केलेला नाही. जहाजात ना इंजिन आहे ना जीपीएस. यात चौकोनी सुती शीड आणि पॅडल लावलेले आहेत. हे पूर्णपणे वा-याच्या साहाय्याने, कापडी शिडाने चालते. या प्रकल्पाची कल्पना संजीव सान्याल यांनी केली होती.

स्वदेशी बनावटीच्या या जहाजाच्या शिडांवर गंडभेरुंड आणि सूर्याची प्रतीके आहेत. पुढच्या बाजूला सिंह यालीची आकृती कोरलेली आहे, तर डेकवर हडप्पा शैलीचा प्रतीकात्मक दगडाचा नांगर बसवण्यात आला आहे. हे सर्व घटक प्राचीन भारतीय सागरी परंपरा दर्शवतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR