37.3 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्र‘इंडिया’चा ‘शक्ती’विरोधात लढा

‘इंडिया’चा ‘शक्ती’विरोधात लढा

आघाडीतील नेत्यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल ‘इंडिया’ आघाडीचे जोरदार शक्तिप्रदर्शन फुंकले शिवतीर्थावरून रणशिंग

मुंबई : जनतेला वाटत असेल आम्ही एका विशिष्ट पक्षाशी, नेत्याशी लढा देतोय मात्र असे नसून आम्ही त्या नेत्याच्या पाठीशी असलेल्या शक्तीशी लढा देत असल्याचे सांगत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींसह आरएसएसवर हल्लाबोल केला. मोदी केवळ चेहरा आहे. ५६ इंचाची छाती नाही, ते फक्त केवळ पोकळ व्यक्ती आहेत, असे म्हणत त्यांच्या पाठीशी असलेल्या शक्तीनेच मणिपूरमध्ये हिंसाचार घडविल्याचा आरोपही गांधी यांनी यावेळी केला.

काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवरच्या जाहीर सभेने झाला. यावेळी इंडिया आघाडीतील नेत्यांनी एकजूट दाखवित शक्तीप्रदर्शन केले. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची रविवार दि. १७ मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर जाहीर सभा पार पडली असून इंडिया आघाडीतील दिग्गज नेत्यांनी दमदार शक्तीप्रदर्शन केले. या सभेला देशातील दिग्गज नेते उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या सभेकडे लागले होते. विशेष म्हणजे शिवाजी पार्कवरील सभेच्या माध्यमातून काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराची सुरुवात केलीे.

मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या आजच्या सभेला राहुल गांधी, प्रियंका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, जम्मू काश्मिरचे नेते फारुख अब्दुल्ला, महेबुबा मुफ्ती, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, वर्षा गायकवाड, रेवांथ रेड्डी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी गांधी म्हणाले की लग्नासाठी १० दिवसात इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरु झाला. मग देशात इतर ठिकाणी विमानतळ बांधायला एवढा वेळ का लागतो, असा सवाल राहुल गांधींनी विचारला आहे. ईव्हीएम शिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकू शकत नाहीत. विरोधी पक्षांना ईव्हीएम दाखवायला सरकार तयार नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. २२ लोकांकडे देशाची सर्व संपत्ती एकवटली आहे, असे म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे.

शिवराय, बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वप्रथम शिवराय आणि शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना शिवतीर्थावरिल सभेपूर्वी अभिवादन केले आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडली. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले आहे. राहुल गांधी शिवाजी पार्कवरिल या सभेतून इंडिया आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडला.

शिवसैनिकांसाठी काळा दिवस : मुख्यमंत्री शिंदे
आज ज्या शिवतीर्थावर बाळासाहेब यांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक यायचे त्याच ठिकाणी काँग्रेसची सभा झाल्याने हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे. ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला. त्यांच्या मांडीला मांडी लावून काही जणं बसलेत. त्या सर्वांनी आधी राहुल गांधींना सावकरांच्या स्मारकाजवळ नतमस्तक करायला हवे होते, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

ठाकरे शरणागत : बावनकुळे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक व्हीडीओ शेअर करत उद्धव ठाकरेंवर टीका केली. शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझे दुकान बंद करेन, अशा आशयाचा बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हीडीओ बावनकुळेंकडून ट्विट करण्यात आला. उद्धव ठाकरे शिवतीर्थावर जाऊन राहुल गांधींसमोर शरणागत झाले का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रात लिडर नाहीत डीलर : यादव
महाराष्ट्रात लिडर नाहीत तर डीलर आहेत. घाबरलेलले लोक गेले त्याने काही फरक पडत नाही, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात फक्त आमदार पळवून नेले, पण बिहारमध्ये आमच्या चाचाला पळवून नेले. माझे काका पुन्हा पलटणार नाहीत याची मोदींनी गॅरंटी द्यावी असा घणाघात तेजस्वी यादव यांनी केला. भाजपच्या लोकांना शेण पण हलवा म्हणून खायला घालतात. मोदी म्हणजे खोटारडेपणाची फॅक्टरी असल्याची टीका तेजस्वी यादव यांनी केली.

एकत्र लढू : आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांनी सभेला संबोधित केले. आपल्या सर्वांना लढावे लागेल. एकत्र लढू किंवा वेगळे लढू, पण आपल्याला लढावे लागणार आहे असे प्रकश आंबेडकर म्हणाले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक रोख्यांच्या मुद्यांवर भाजपवर हल्लाबोल केला. अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले पाहीजे.

ईव्हीएम मशिन बंद करू : अब्दुुल्ला
फारूक अब्दुल्ला म्हणाले की, हिंदू, मुस्लीम, शिख देशातील सर्वजण भारतीय आहेत. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर ईव्हीएम मशीनद्वारे मतदान बंद होईल. त्याशिवाय निवडणूक आयोग पूर्णपणे मुक्त होईल, अशी मोठी घोषणा त्यांनी केली आहे.

भाजप फुगा, आम्हीच हवा भरली : ठाकरे
भाजप एक फुगा, ज्यात आम्हीच हवा भरली, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला असून अबकी भाजपा हद्दपारचा नाराही त्यांनी यावेळी दिला.

मोदींची गॅरंटी चालणार नाही : पवार
शरद पवार म्हणाले की देशाची परिस्थिती बदलण्याची गरज आहे. ज्यांनी देशाला वेगवेगळे आश्वासन दिले पण प्रत्यक्षात काहीच केले नाही. त्यांच्याविरोधात आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाची परिस्थिती बदलली पाहिजे. देशात मोदी की गॅरंटी चालणार नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाची परिस्थिती बदलण्याची गरज आहे. दबाबतंत्राविरोधात आपल्याला लढले पाहिजे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR