चिखलदरा : मेळघाटच्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यांतील वन विभाग तसेच व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात बुधवारी सकाळपासून भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मेळघाटात हा वणवा पेटला असून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर वनसंपदा जळून खाक होत आहे. या भीषण आगीमुळे मौल्यवान वनस्पती, वन्यजीव आणि पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत असून अनेक भागांत आग अजूनही धगधगत आहे.
या गंभीर परिस्थितीबाबत ‘खोज’ संस्थेचे अॅड. बंड्या साने यांनी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक ज्योती बॅनर्जी यांना तातडीने संपर्क करून माहिती दिली. जंगलाला लागलेल्या या मोठ्या आगीची गांभीर्याने दखल घेत, क्षेत्र संचालकांनी मेळघाटच्या धारणी, चिखलदरा आणि परतवाडा येथील सर्व उपवनसंरक्षकांसह वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचा-यांना युद्धपातळीवर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आदेश दिले आहेत.
अतिरिक्त यंत्रणा पुरवण्याची गरज
सध्या मेळघाटातील आगीची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आणि गंभीर बनली आहे. वन विभागाने प्रत्यक्ष जमिनीवर उतरून तातडीने अतिरिक्त मनुष्यबळ, आधुनिक अग्निशमन साहित्य आणि आवश्यक ती सर्व यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून ही आग लवकरात लवकर आटोक्यात आणून पुढील मोठी हानी टाळता येईल, अशी मागणी केली जात आहे.
















