बंगळूरू : २०२३ च्या बंगळूरू तुरुंग कट्टरतावाद प्रकरणात एका महत्त्वपूर्ण निकालात, एनआयए विशेष न्यायालयाने सूत्रधार टी. नसीरसह सात आरोपींना दोषी ठरवले आहे. सर्व दोषींना सात वर्षांच्या सक्त कारावासाची आणि ४८,००० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात टी. नसीर व्यतिरिक्त सय्यद सुहेल खान, मोहम्मद उमर, झाहिद तबरेज, सय्यद मुदस्सिर पाशा, मोहम्मद फैसल रब्बानी आणि सलमान खान यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण लष्कर-ए-तोयबाशी संबंधित एका दहशतवादी कटाशी निगडित आहे, हे बंगळूरच्या परप्पना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात रचण्यात आला होता. या कटात, भारतातील दहशतवादी कारवायांमध्ये वापरण्यासाठी कारागृहात कैद असलेल्या तरुणांना ओळखणे, त्यांची भरती करणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि कट्टरपंथी बनवणे यांचा समावेश होता.
बंगळूरुमध्ये दहशतवादी हल्ल्याची तयारी
आरोपी बंगळूरुमध्ये दहशतवादी हल्ला करण्याची आणि बंदी घातलेल्या संघटनेचा भारतविरोधी अजेंडा पुढे नेण्याच्या नियोजनात होते. काही गुन्हेगारांकडून शस्त्रे, दारुगोळा आणि डिजिटल उपकरणे जप्त केल्यानंतर, बंगळूरु सेंट्रल क्राइम ब्रँचने जुलै २०२३ मध्ये हा गुन्हा दाखल केला होता. नंतर हा तपास ‘एनआयए’कडे हस्तांतरित करण्यात आला.

