32.3 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रशांतिगिरी महाराज कोट्यधीश

शांतिगिरी महाराज कोट्यधीश

सुमारे ३९ कोटींची मालमत्ता नऊ वाहने, मठ, गुरुकुले आणि शेतीसह बरेच काही

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून नामनिर्देशनपत्र दाखल करणारे अपक्ष उमेदवार व जय बाबाजी भक्त परिवाराचे श्रद्धास्थान शांतीगिरी महाराज यांच्याकडे ३८ कोटी ८१ लाख ५३ हजार ५३३ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. शांतिगिरी महाराज यांनी प्रतिज्ञापत्रात मालमत्तेचे विवरण दिले असून त्यात नऊ वाहनांसह अनेक ठिकाणी मठ, गुरुकुले, शेतीसारख्या स्थावर मालमत्तांचा समावेश आहे. दिंडोरीचे माकपचे उमेदवार माजी आमदार जे. पी गावित यांच्याकडेही सुमारे चार कोटींची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. माकपकडूनच अर्ज भरणारे सुभाष चौधरी यांच्याकडे ९२ लाखांची मालमत्ता असून त्यांच्यावर २० लाखांचे कर्ज आहे.

वेरुळ मठाचे मठाधिपती शांतिगिरी महाराज नाशिक जिल्ह्यातील लाखलगावचे आहेत. जनार्दन स्वामींचे ते उत्तराधिकारी म्हणून आध्यात्मिक कार्य करीत आहेत. नाशिक लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले असून, शुक्रवारी (दि. २६) उमेदवारी अर्जही सादर केला.

नामनिर्देशनपत्रासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांनी आपल्याकडील स्थावर व जंगम मालमत्तेचे विवरण सादर केले आहे. लाखलगाव येथील शाळेतून १९७६ मध्ये ते एसएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्याकडे ७१ लाख ६८ हजार ६६४ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यात ६७ लाख ९१ हजार ४८६ रुपये मूल्य असलेल्या सफारी, टेम्पो, पिकअप, दोन स्कूल बस, टाटा ४०७, हायवा, एमयूव्ही, टीयूव्ही यांसारख्या नऊ वाहनांचा समावेश आहे. वेगवेगळ्या बारा बँक खात्यांमध्ये ७० हजार ४५८ रुपयांच्या ठेवी असून, हाती ५० हजार रुपये रोकड आहे. एफडी आणि विमा पॉलिसीचे मूल्य २ लाख ५६ हजार ७२० रुपये इतके आहे. स्थावर मालमत्तांमध्ये ५३ ठिकाणी वारसा हक्क व स्वमालकीची शेतजमीन व निवासी संकुलांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ, कन्नड, खुलताबाद, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे मिळकती आहेत. शांतिगिरी महाराजांवर पोलिस स्टेशनमध्ये एकही गुन्हा दाखल नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR