39.2 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeसोलापूरसोलापूरचे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला पळवले

सोलापूरचे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला पळवले

सोलापूर : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत सोलापूरसाठी मंजूर झालेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला स्थापन होणार आहे. शासनाच्या नवीन निर्णयात तसे स्पष्टपणे नमूद आहे. त्यामुळे प्रशिक्षणाचा पार्ट नव्हे तर केंद्रच त्याठिकाणी स्थापन होणार हे निश्चित आहे.

सोलापूर जिल्हा रब्बीचा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात रब्बीचे सव्वाचार लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्र असून दरवर्षी त्यातील तीन लाख हेक्टरवर ज्वारीची पेरणी होते. तृणधान्यासंदर्भात काम करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात ३७ कंपन्या असून त्याअंतर्गत दहा हजार शेतकरी सभासद आहेत. या सर्व बाबींचा अभ्यास करूनच शासनाने केंद्रासाठी सोलापूरची निवड केली होती. पण, ९ मार्च ते २१ नोव्हेंबर या दरम्यान ना शासन स्तरावरून ना हैदराबादच्या राष्ट्रीय तृणधान्य संशोधन संस्थेने (आयआयएमआर) त्या केंद्रासंदर्भात त्रुटी काढली.

प्रशिक्षणासाठी इमारत उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून केंद्र बारामतीला स्थापन करण्याचा निर्णय झाला. परंतु, सोलापुरात डाळिंब संशोधन केंद्र, कोरडवाहू ज्वारी संशोधन केंद्र, एनटीपीसी अशा मोठ्या केंद्रांमध्ये प्रशिक्षणाची सोय करता आली असती, असे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. कोणालाही विश्वासात न घेता परस्पर झालेल्या या निर्णयाचा फटका राष्ट्रवादीला (अजित पवार गट) आगामी काळात बसू शकतो, असेही बोलले जात आहे.

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या (स्मार्ट) संचालकांनी श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासंदर्भात सुधारित प्रस्ताव सादर केला. त्या अनुषंगाने निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार ते केंद्र बारामतीला स्थापन करण्यास तत्काळ मान्यता दिली गेली. स्मार्ट च्या प्रकल्प संचालकांनी त्यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करावी, असे नवीन शासन निर्णयात नमूद आहे. त्यात कोठेही प्रशिक्षणाचा भाग बारामतीला गेल्याचा उल्लेख नाही. मुळात त्या केंद्राअंतर्गतच प्रशिक्षणासह सर्व बाबींचा समावेश असल्याने काही भाग असा हलविताच येत नाही, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

एप्रिलमधील शासन निर्णय आणि काही दिवसांपूर्वी नव्याने निघालेला शासन निर्णय, याचा विचार करता सोलापुरात मंजूर झालेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला स्थापन करण्यात येणार असल्याचे स्पष्टपणे नमूद आहे. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रशासनातील काहीजण प्रकल्प गेला नाही, प्रशिक्षणाचा भाग बारामतीला गेल्याचे सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्यांच्या शिफारशीनुसार हे केंद्र बारामतीला गेले, त्याअंतर्गत नेमक्या कोणकोणत्या बाबी आहेत, बारामतीला नेमके काय गेले आहे आणि स्मार्ट प्रकल्पातून सोलापूरला काय मिळणार आहे, याचा खुलासा प्रकल्प संचालक म्हणून आपण करावा, असे पत्र आमदार सुभाष देशमुख यांनी कौस्तुभ दिवेगावकर यांना पाठविले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR