35.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeधाराशिवसाहेब, ताई आमच्याकडे बी बघा...

साहेब, ताई आमच्याकडे बी बघा…

सतीश टोणगे
कळंब: प्रतिनिधी
सध्या लोकसभा निवडणूकीचा हंगाम तापू लागला आहे, घरात बसणारे पुढा-यांच्या घरातील मंडळी बाहेर पडून संपूर्ण मतदार संघात गावभेट अभियान राबवित आहेत. निवडणूक तोंडाशी आली की नेते मंडळीची चुळबुळ सुरू होते.. अमुक करू तमुक करू म्हणत कुरवाळतात.. कुणीबी पाच वरीस ईचारत नाही.. गरीब बिचारा मतदार आश्वासनावर जगत आहे.. नेतेमंडळी गोड गोड बोलून मतदान घेतात आणि खुर्ची मिळाली की ईसरून जातात.. ना शेतीबाडीची पर्वा ना ईकासाचा पत्ता.. आमच्या ऊतरंडीत सदा खडखडाटच.. आम्ही नेहमीच मतदान देवुन ईमान राखतो पण.. तरी तुम्हाला आमची कीव येत नाही.. साहेब.. आमचं नशीब कधी उजळंल.. असा संतप्त सवाल मतदार करून थकला तरी कायबी पदात पडत नाही.

पूर्वी खेडोपाडी मान, मर्तबा, ईज्जत, माणुसकीचा ओलावा असायचा. गावातील पारावर बैठक घेऊन मुख्य नायक जो निर्णय देईल त्यावर ग्रामस्थ ठाम असायचे. आता सारे रूपच पालटून गेल आहे. दगडाखाली नेते, पुढारी झालेत. कुणी कुणाच ऐकून घेत नाही. गावागावात गटतटाची कीड लागलीआहे. लोखाभिमुख विकास होताना दिसत नाही. निवडणुकीचा हंगाम आला की राजकीय मंडळीची चुळबुळ सुरू होते. एरवी कुणी इकडे फिरकत नाही. तळागाळातील सर्वसामान्य माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. प्रामुख्याने शेती, शिक्षण, आरोग्य, पाणीटंचाई अशा अत्यावश्यक सुविधाकडे राजकीय मंडळी लक्ष देत नाहीत. निवडणूकदरम्यान जाहीरनाम्यात नमूद केलेली कामे किती प्रमाणात मार्गी लागली याचा थांगपत्ता लागत नाही. दादा, ताई आता तरी आमच्याकडे बघा अशी विनवणी मतदार करू लागला आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीने विविध राजकीय पक्षाचे नेते, पुढारी, पदाधिकारी, कार्यकर्ते मतदारांना गोंजारत असल्याचे दिसून येत आहे. मागील पाच वर्षांत त्यांना कधीच मतदारांची आठवण आली नाही. तेच मंडळी स्वत:ची खुर्ची टिकवण्यासाठी जिवाचे रान करीत आहेत. हेच परिश्रम अगोदरपासून घेतले असते तर दारोमदार फिरण्याची वेळ आली नसती, अशी राजकीय जाणकार मंडळीत चर्चा सुरू आहे. तुम्ही तुमची सत्ता काबीज करा; पण मतदारांच्या मूलभूत गरजांकडे तितक्याच तन्मयतेने पाहणे गरजेचे आहे. असे मत सुजाण मतदारांकडून व्यक्त होत आहे. गावागावांमध्ये पारावर, चावडीवर रंगत आहेत, राजकारणाच्या गप्पा. हार जित वर चर्चा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR