36.3 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeसोलापूरसोलापूर लोकसभा मतदारसंघात काट्याची टक्कर

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काट्याची टक्कर

रणजीत जोशी
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार संघर्ष सुरू आहे.आमदार प्रणिती शिंदे आणी आमदार राम सातपुते या दोन्ही उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. प्रणिती शिंदे या ग्रामीण भागाबरोबरच शहरातही समांतर पध्दतीने प्रचार करत आहेत. कॉर्नर बैठका, विविध रहिवासी सोसायट्यांमधून नागरीकांबरोबर संवाद बैठका यावर प्रणिती यांचा भर आहे तर राम सातपुते यांनी दुस-या तिस-या फळीतील नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन वैयक्तीक जनसंपर्कावर भर दिला आहे.

सोलापूर शहराचे अनेक प्रश्न अधांतरी असून नागरीकांमध्ये नाराजी आहे मात्र विकासाचे ठोस आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर तसेच हिंदुत्वाचा अजेंडा वापरत राम सातपुते मतदारांच्या भावनेला हात घालत आहेत. वैयक्तीक तसेच कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून थेट संवादावर भर देण्यात येत आहे. ग्रामीण भागात प्रणिती शिंदे गावभेट दौरे करत असून थेट संपर्क साधण्याची त्यांची शैली असून ग्रामीण जनतेमधून त्यांना प्रतिसादही मिळत आहे.

माजी आमदार दीलीप माने यांनी काँग्रेस प्रवेश केल्याचा फायदा प्रणिती शिंदे यांना उत्तर व दक्षिण सोलापूर मतदारसंघात होऊ शकेल. याबरोबरच धर्मराज काडादी यांच्या सिध्देश्वर परिवाराने प्रणिती शींदे यांना पाठिंबा दिला असून सिध्देश्वर कारखान्याची चिमणी पाडण्याचा मुद्दा निवडणूकीत महत्वाचा ठरणार आहे. सोलापूरच्या विकासाच्या प्रश्नांऐवजी आरोप-प्रत्यारोप करण्याकडे दोन्ही उमेदवारांचा कल आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात घटक पक्षांची साथ महत्वाची ठरणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उध्दव ठाकरे गट यांची भूमिका प्रणिती शिंदेंसाठी महत्वाची ठरणार आहे.

तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची भूमीका राम सातपुतेंसाठी महत्वाची ठरणार आहे. सोलापुरात प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीमुळे शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांमधून उत्साह दिसत असून राम सातपुते हे बाहेरचे उमेदवार असल्याचा प्रचार प्रणिती शिंदेंकडून केला जात आहे.माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे रणनिती आखत असून माढा लोकसभा मतदारसंघातील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील प्रवेशाचा फायदा प्रणिती शिंदे यांना मिळू शकतो. सोलापूर जिल्ह्यातील मोहिते -पाटील समर्थकांचा पाठींबा प्रणिती शींदे यांना मिळाल्याने त्यांची ताकद वाढू शकते. सोलापूर लोकसभा मतदार संघात महायुती आणी महाविकास आघाडीमध्ये काट्याचा सामना रंगताना दिसतो आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR