26.7 C
Latur
Monday, July 8, 2024
Homeसोलापूरअक्कलकोटचे विकासाचे प्रश्न सोडवण्याची खा. शिंदेंकडून अपेक्षा

अक्कलकोटचे विकासाचे प्रश्न सोडवण्याची खा. शिंदेंकडून अपेक्षा

अक्कलकोट – सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नूतन खा. प्रणिती शिंदे यांच्याकडून अक्कलकोट तालुक्यातील तसेच विधानसभा मतदारसंघातील जनतेकडून अपेक्षा वाढल्या आहेत. अक्कलकोट ग्रामीण बासलेगाव रोड, मैंदर्गी रोडवरील रहिवाशांना गेल्या दहा वर्षांपासून रस्ता काँक्रीट सांडपाणी, गटार, पर्यादिवे, नागरी सुविधा नाहीत. खासदार निधीतून रस्ते, गटार, सोलर पथदिवेकरिता निधी देण्याची मागणी रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.

युवा खासदार प्रणिती शिंदे यांच्या कामाबाबत नागरिकात उत्सुकता वाढली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या ७४ हजार इतक्या मताधिक्याने निवडून आले आहेत. नूतन खासदार प्रणिती शिंदे यांची अभ्यासू आक्रमक वक्तृत्व शैली, युवा व्यक्तिमत्व, विधानसभेतील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव, जनतेशी आपुलकीने वागण्याची उदारता, गोरगरीब जनतेच्या कामासाठी धावून जाण्याची वृत्ती या गुणांमुळे खासदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रचारादरम्यान विकासाच्या मुद्यावर जोड दिल्याने सर्व जनतेने त्यांना खासदार म्हणून निवडून दिले.

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून ही खासदार प्रणिती शिंदे यांना मोठा पाठिंबा मिळाला. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून जरी खासदार प्रणिती शिंदे यांना मताधिक्य मिळाले नसले तरी भाजपाच्या मताधिक्यामध्ये मोठा फरक पडला आहे. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार माजी खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांना ४७ हजार मताधिक्य अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून मिळाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना ९२९७ इतके मताधिक्य अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून मिळाले आहे. जवळपास ३७ हजार मते ही कॉंग्रेस महाविकास आघाडीकडे वळली आहेत.

वास्तविक पाहता भाजपाचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून भाजपाला मोठे मताधिक्क्य देण्याची ग्वाही दिली होती. पण मतदारानी युवा खासदार प्रणिती शिंदे यांनाच अधिक पसंती देत मतदान केल्याचे सिद्ध झाले आहे. पुढील काळात युवा खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून विकासासाठी अक्कलकोट तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अक्कलकोट नगरी ही देशातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र नगरी आहे. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी देश विदेशातून वर्षाला लाखो भाविक हे दर्शनासाठी येत असतात. या भाविक भक्तांची वाढती संख्या पाहता अक्कलकोट नगरीच्या विकासासाठी केंद्राकडे निधीचा पाठपुरावा करणे, अक्कलकोट शहरात केंद्राच्या योजना राबविण्याचे काम नूतन खासदार प्रणिती शिंदे यांना करावे लागणार आहे.

तसेच अक्कलकोट रेल्वे स्थानकात ज्या जलद रेल्वे गाड्या आहेत त्यांना थांबा मिळावा ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून ची आहे. या कामी युवा खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्यास याचा फायदा श्री स्वामी समर्थ भक्तांना होणार आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात बेरोजगार तरुणांना काम मिळण्यासाठी मोठ्या कंपन्या आणण्यासाठी युवा खासदार प्रणिती शिंदे यांनी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्याची मागणी बेरोजगार युवा वर्गातून केली जात आहे. केंद्राच्या विविध योजनांचा फायदा थेट नागरिकांना मिळण्यासाठी नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्या कामाबाबत नागरिकात उत्सुकता वाढल्याचे चित्र दिसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR