36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रजनतेच्या खात्यावर १५ लाख कधी टाकणार?

जनतेच्या खात्यावर १५ लाख कधी टाकणार?

मुंबई : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधील जाहीर सभेत सक्तवसुली संचालनालयाने जप्त केलेले तीन हजार कोटी रुपये गरिबांमध्ये वाटणार असल्याचे विधान केले आहे. मात्र या विधानावरून आता उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींना १५ लाख रुपये प्रत्येक भारतीयांच्या खात्यावर टाकण्यासंदर्भातील आश्वासनाची आठवण करून दिली.

तोंडभरून आश्वासने देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात कुणी धरणार नाही. मागील १० वर्षांपासून देशातील जनता याचा चांगलाच अनुभव घेत आहे. आता पंतप्रधानांनी आणखी एका फसव्या आश्वासनाचा रंगीत फुगा पश्चिम बंगालच्या आकाशात सोडला आहे. पश्चिम बंगालमधील गरिबांचा लुटलेला पैसा ‘ईडी’ने जप्त केला आहे. तो त्या राज्यातील गरिबांना वाटणार, असे गाजर मोदी यांनी तेथील जनतेला दाखविले आहे, असा टोला ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींना लगावला आहे.

पश्चिम बंगालमधील कृष्णनगर लोकसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांच्याविरोधात भाजपने राजघराण्यातील राजमाता अमृता रॉय यांना उमेदवारी दिली आहे. मोदी यांनी अमृता रॉय यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी गरिबांकडून लुटलेला पैसा गरिबांना परत करण्याच्या फुग्यात हवा भरली. मोदी यांनी ही घोषणा करताना सांगितले की, पश्चिम बंगालमधील ईडीने सुमारे तीन हजार कोटी रुपये जप्त केले आहेत. हा सगळा सामान्य जनतेकडून लुटलेला पैसा आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा हा पैसा तिचा तिला मिळायला हवा, अशी आपली भूमिका आहे.

फक्त मोदी यांचे हे आश्वासन सत्यात उतरणार की आजपर्यंतच्या अनेक आश्वासनांप्रमाणे लोकसभा निवडणूक संपल्यावर हवेत विरून जाणार? हा खरा प्रश्न आहे, असे ठाकरे गटाने ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

आश्वासनांचे फुगे हवेत सोडले
मोदी बोलतात खूप, भावनांना हात घालत आश्वासनांची पीकपेरणी करण्यात ते तरबेज आहेत. पंतप्रधान आणि त्यांचा पक्ष आश्वासनांचे बिनहवेचे फुगे हवेत सेडत बसला आहे. २०१४ च्या निवडणूक प्रचारात मोदी आणि त्यांच्या पक्षाने ‘महंगाई डायन’ नष्ट करण्याचे, काही कोटी रोजगार निर्माण करण्याचे, जीवनावश्यक वस्तूंची स्वस्ताई आणण्याचे आश्वासन दिले होते. आज सलग दहा वर्षांच्या मोदी राजवटीनंतर काय चित्र आहे? ना महागाई हटली ना बेरोजगारी. ना विकास झाला ना नवीन रोजगारनिर्मिती. देशातील तब्बल ८३ टक्के तरुण बेरोजगार आहेत.

काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन
नवडणूक प्रचारात परदेशातील काळा पैसा परत आणू आणि प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करू, असे मोदी तोंड फाटेस्तोवर सांगत होते. मात्र दहा वर्षांत ना १५ लाख रुपये बँक खात्यात जमा झाले ना त्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेवर मोदी यांनी तोंड उघडले. मोदी यांनी आपले शब्दही गिळले आणि वल्गनादेखील, असा टोला लेखातून लगावण्यात आला आहे.

तीन हजार कोटींच्या गाजराची पुंगी
आता पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या जप्त केलेले तीन हजार कोटी रुपये तेथील गरिबांना वाटण्याचे शब्ददेखील मोदी निवडणुकीनंतर गिळून टाकू शकतात. आधी तुमचे ते १५ लाख रुपये बँक खात्यात कधी जमा करणार ते सांगा. पुन्हा ईडीच्या कस्टडीमधील तीन हजार कोटींच्या गाजराची पुंगी वाजवा, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR