28.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeधाराशिवधाराशिव लोकसभा मतदार संघात महायुती नव्हे महाभिती?

धाराशिव लोकसभा मतदार संघात महायुती नव्हे महाभिती?

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव लोकसभा मतदार संघात महायुती विरुध्द महाविकास आघाडी अशी जोरदार लढत होत आहे. उन्हाचा पारा जसजसा वाढत आहे, त्याप्रमाणे आरोप-प्रत्यारोपाचा पारा चढला आहे. यामध्ये या मतदार संघात महायुतीकडे एक मंत्री तब्बल ७ आमदार आहेत, याशिवाय अनेकजणांनी भाजपात प्रवेश केला आहे. महायुतीची इतकी मोठी फौज असल्यामुळे त्यांचा विजय होणे सहज सोपे असताना महायुतीच्या नेत्यांमध्ये महाभिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण या मतदार संघातील अनेक नेतेमंडळी ही केवळ कारवाईच्या भितीपोटी भाजपाच्या आश्रयाला गेली असून त्यापैकी अनेकजण केवळ नावालाच प्रचारात असल्याची चर्चा सध्या मतदार संघात जोरदार सुरु आहे.

केवळ आपल्यावर कारवाई होवू नये या भितीपोटी ते महायुतीच्या प्रचारासाठी एकवटली आहे. याउलट मतदार राजा महागाईने त्रस्त आहे. तसेच या मतदार संघातील शेतकरी जनता शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे महायुतीला हिसका दाखवण्यासाठी चांगलीच फिस्कटल्याचे चित्र दिसून येत आहेत. याच भितीपोटीही देशाचे खुद्द पंतप्रधान मोदी यांचीही या मतदार संघात सभा ठेवली आहे. धाराशिव लोकसभा मतदार संघात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीकडे तानाजी सावंत यांच्या माध्यमातून एक मंत्री तसेच विविध सात आमदारांची फौज असताना महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावे लागत आहे. हेच यावरुन धाराशिव लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी त्यांना तगडे आव्हान उभा केल्याचे स्पष्ट होत आहे.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी या मतदार संघातील भूम-परंडा-वाशी विधानसभेचे आमदार तथा राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यासह माजी मंत्री तथा आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. अभिमन्यू पवार, आ. ज्ञानराज चौगुले, आ. राजाभाउ राउत, शिक्षक आमदार विक्रम काळे, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, स्थानिक स्वराज्य संस्थेचे आ. सुरेश धस असे सात आमदार आहेत. तसेच कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव सुनिल चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तसेच माजी खासदार रविंद्र गायकवाड यांच्यासह तीनही प्रमुख पक्षाचे पदाधिकारी यांची भली मोठी फौज आहे. ही फौज प्रचारात सक्रीय झाली असून प्रत्येक ठिकाणी बैठका, सभा असा प्रचार सुरु आहे. महायुतीमध्ये प्रचारासाठी नेतेमंडळीची मोठी फौज उतरली असली तरी याउलट मतदार राजा मात्र डिझेल, पेट्रोल, गॅस दर, शेतीमालास मिळणारा दर यामुळे त्रस्त असून ती सरकार विरोधात असल्याचे चित्र आहे.

महागाईच्या भडक्यामुळे जनता सरकार विरोधात असून सरकारच्या विरोधात सर्वसामान्य नागरिक बोलताना दिसत आहे. याचीच भिती महायुतीच्या नेत्यांना सतावत आहे. याचाच परिणाम म्हणून महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ धाराशिव लोकसभा मतदार संघातील एक मंत्री व सात आमदारांची फौज असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री धनंजय मुंढे, पंकजा मुंढे, बाबा सिध्दीकी आदींच्या सभांचे नियोजनही केले आहे. याच भितीपोटी खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी (दि.३०) धाराशिव येथे सभा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीचा एवढा फौजफाटा असताना पंतप्रधानांची सभा घेणे म्हणजे महायुतीच्या नेत्यांना विजयाबाबत संभ्रम आहे. अशी चर्चा या मतदार संघातील नागरिकांमध्ये जोरदार सुरु आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR