34 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeलातूरअबकी बार जनता की सरकार

अबकी बार जनता की सरकार

उदगीरच्या प्रचारसभेत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे आवाहन

उदगीर : प्रतिनिधी
देशाची एकात्मता, आपले संविधान आणि आपली लोकशाही वाचवायची असेल तर ‘अबकी बार जनता की सरकार’ ही घोषणा आता लक्षात ठेवावी लागेल, असे सांगून येत्या ७ तारखेला हाताच्या चिन्हा समोरील बटन दाबून लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी उदगीर येथील ऐतिहासिक आणि उत्साहपूर्ण सभेत बोलताना केले.

लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी दुपारी उदगीर येथे विराट प्रचार सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. प्रारंभी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या की, मराठवाडा संतांची भूमी असल्याचे सांगत उदगीरचे हावगी स्वामी, हजरत ख्वॉजा यांच्या प्रतिश्रद्धेने नमन केले. या परिसरातील शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची शिकवण आपणाला कायम चांगल्या कार्याची प्रेरणा देत राहील, असे त्यांनी म्हटले.

यावेळी भाजप नेत्यांच्या वक्त्तव्यांचा समाचार घेत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या की, मागच्या ७० वर्षांत काँग्रेसने काय केले म्हणून काय विचारता यापेक्षा तुम्ही दहा वर्षात काय केले हे सांगून मते मागा. काँग्रेसने ७० वर्षात काय केले हे जनतेला माहित आहे, तुम्ही सत्तेवर येताना जनतेच्या बँक खात्यावर १५ लाख पाठवतो म्हणाला होतात, त्याचे काय झाले, दरवर्षी दोन कोटी रोजगारांचे काय झाले, महागाई गगनाला का भिडली, सोयाबीनला भाव का मिळत नाही, महिलांना सुरक्षित का वाटत नाही, जनतेला आता या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. या निवडणुकीत जनतेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पंतप्रधानांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे पुन्हा खालचा थरावर जाऊन ते काँग्रेसवर टीका करू लागले आहेत, आमच्या परिवारावर बोलू लागले आहेत, आमच्या परिवारावर बोलल्यास आम्ही सहन करू. परंतु जनतेच्या प्रश्नाला उत्तर कोण देणार असा प्रश्न प्रियंका गांधी या सभेत उपस्थित केला तेव्हा जनतेने त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात उस्फूर्त साथ दिली.

पहिल्या पाच वर्षात दिलेली आश्वासन पूर्ण केली नाहीत पुन्हा तीच आश्वासन देऊन निवडून आले. आता तिस-यांदा काय सांगायचे हा प्रश्न सत्ताधा-यांसमोर आहे, त्यामुळे लोकशाही मार्गाने आलेली महाराष्ट्रसह इतर राज्यातील सरकारे पैसा आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करुन या सत्ताधारी मंडळींनी पाडली आहेत. भ्रष्टाचारांना संरक्षण दिले जात आहे. हे जनतेला अजिबात आवडलेले नाही, हे नुकत्याच पार पडलेल्­या दोन टप्प्यातील मतदानावरून दिसून आले. सत्ताधा-यांना ४०० पेक्षा अधिक जागा कशासाठी निवडून आणायच्या आहेत, याची जाणीव देशातील जनतेला झाली आहे. लोकशाही सोबत छेडछाड करून सत्ताधा-यांनी अगोदरच अक्षम्य अपराध केला आहे.

त्यांना शिक्षा देण्यासाठी ही निवडणूक एक संधी आहे, असेही प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या. दरम्यान माजी गृहमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या बद्दल आदर व्यक्त्त करून या भूमीने डॉ. शिवाजीराव पाटील आणि विकासाभिमुख आणि लोकप्रिय नेतृत्व आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख, असे दोन मुख्यमंत्री दिल्याचाही उल्लेख आपल्या भाषणात आवर्जून केला. यावेळी माजी नगराध्यक्षा उषाताई कांबळे, उदगीर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे निरीक्षक रवींद्र काळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते लातूर लोकसभा मतदारसंघातील युवक, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी व्यासपीठावर विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा वैशालीताई देशमुख, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार त्र्यंबक भिसे, सौ. दिपशिखा धीरज देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बसवराज पाटील, सौ. सविता काळगे, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, माजी महापौर दीपक सूळ, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, अभय साळुंखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मतदानाला जाण्यापूर्वी जनतेने विचार करावा
मतदानाला जाण्यापूर्वी जनतेने डोळे मिटून थोडा विचार करावा, आपला देश आणि आपला परिवार सुरक्षित करण्यासाठी हे मतदान करायचे आहे, हे लक्षात घ्यावे. आपणाला कोण फसवत आहे हेही लक्षात घ्यावे असे सांगून काँग्रेसने शेतीमालाला हमीभाव देण्याचे, महिलांना सुरक्षा पुरवण्याचे युवकांच्या हाताला काम देण्याचे, कष्टक-यांच्या श्रमाचे योग्य मोल करण्याची आणि सामाजिक न्याय देण्याची गॅरटी दिली आहे. काँग्रेसने आजवर जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण केल्याची जवळच्या राज्यात म्हणजे कर्नाटकात आणि तेलंगणातील उदाहरणे ताजी आहेत, असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.

कॉंग्रेसला शक्ती देण्याचा निर्धार करावा
देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊन प्रगतीपथावर नेणा-या, दिलेली आश्वासने पाळणा-या, सर्व जाती-धर्माना सोबत घेऊन जाणा-या काँग्रेस पक्षाला शक्ती देण्याचा निर्धार करावा आणि येत्या सात तारखेला हाताच्या चिन्हा समोरील बटन दाबून डॉ. शिवाजी काळगे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

महाविकास आघाडीच्या बाजूने ठाम उभे राहावे
या लढाईत अखेरपर्यंत आपण सर्वांनी एकजुटीने, एकदिलाने काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बाजूने ठाम उभे राहावे, असे आवाहन आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी यावेळी केले. या विराट सभेसमोर आदरणीय प्रियंका गांधीजी यांनी गेल्या १० वर्षांत देशात निर्माण झालेले विदारक चित्र, सर्वसामान्यांच्या, शेतक-यांच्या, महिलांच्या, कष्टक-यांच्या व्यथा तळमळीने अन् तडफेने मांडल्या. त्यावेळी त्यांच्या व्यक्तिमत्वात आदरणीय इंदिरा गांधीजी यांची छबी आणि आदरणीय राजीव गांधीजी यांचे विचार अनुभवायला मिळत होते. त्यांनी वाढती महागाई, बेरोजगारी, महिला असुरक्षितता याला जनता वैतागली आहे. त्यामुळेच प्रियंका गांधीजी यांनी अब की बार, जनता की सरकार असा नारा दिला. हा नारा सत्यात उतरणार हा विश्वास आपल्या सर्वांना आहे. यासाठी या लढाईत अखेरपर्यंत आपण सर्वांनी एकजुटीने, एकदिलाने काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बाजूने ठाम उभे राहावे, असे आवाहन केले.

मतदानरुपी आशिर्वाद देऊन मला संसदेत पाठवा
देशातील जनता महागाइने बेजार आहे. शेतीमालाला भाव मिळत नाही, महीलाच्या मनात असुरंक्षिततेची भावना आहे. युवकांच्या हाताला रोजगार नाही ही परिस्थिती बदलण्यासाठी परिवर्तनाची गरज असल्याचे प्रतिपादन लातूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांनी केले. आपण मतादनरुपी आशीर्वाद देऊन मला संसदेत पाठविल्यास लातूरचे प्रश्न लोकसभेत मांडून ते सोडवले जातील. लातूरची विकासप्रक्रिया कायम गतीमाल ठेवण्यासाठी मी प्रयत्न करेन, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

येणा-या काळात देशाच्या राजकारणात बदल होणार : आमदार अमित विलासराव देशमुख
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, आपण लोकसभा निवडणूकीच्या माध्यमातून डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. आज आपल्या सभेसाठी पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी देशातील एका नव्या बदलासाठी लाटेच्या रुपात या ठिकाणी सहभागी झाल्या असून येणा-या काळात देशाच्या राजकारणात बदल नक्की होणार, असा विश्वास व्यक्त्त करीत डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
चौकट

इंदिरा जैसी छबी लेकर आयी है, भारत देश मे लहर लायी है
सभास्थळी काँग्रेस नेत्या प्रियंकाजी गांधी आणि माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांचे एकत्रित आगमन झाले. इंदीरा जैसी छबी लेकर आयी है, भारत देश मे लहर लायी है, अशा घोषणा आमदार अमित देशमुख यांनी देण्यास सुरूवात केली तेव्हा सभेत प्रचंड असा उत्साह संचारला. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आपल्या भाषणाला सुरूवात करताना सर्वांना माझा रामराम असे मराठीत म्हणत नमस्कार केला. यावेळी उप­स्थितांनीही नमस्कार म्हणत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR