Homeमहाराष्ट्रमान्सून २६ मे रोजी केरळात?

मान्सून २६ मे रोजी केरळात?

हवामान खात्याचा अंदाज, यंदाही लवकर आगमन
मुंबई : प्रतिनिधी
केरळमध्ये नैऋत्य मान्सून वेळेआधी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या अंदाजानुसार २६ मे २०२६ रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचू शकतो. यात चार दिवसांचा फरकही असू शकतो. त्यामुळे २२ मे ते ३० मेदरम्यान कधीही मान्सून केरळात धडकू शकतो, असा अंदाज वर्तविला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील ४८ तासांत दक्षिण अंदमान समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान-निकोबार बेटांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. १६ मेच्या आसपास मान्सून अंदमान परिसरात दाखल होण्याची शक्यता आहे तर २६ मे रोजी मान्सून केरळात दाखल होऊ शकतो. त्याचबरोबर ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, माहे आणि दक्षिण कर्नाटकात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.

मुसळधार पावसाचा इशारा
१९ मेपर्यंत ईशान्य भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागांत ताशी ५० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्याने त्याचा परिणाम पुढील काही दिवस देशातील हवामानावर दिसून येणार असल्याचे आयएमडीने स्पष्ट केले आहे.

कोकणात मान्सूनची शक्यता
आयएमडीच्या अंदाजानुसार, मान्सून ५ जूनपर्यंत गोव्यात दाखल होण्याची शक्यता असून ६ जूनपर्यंत तो कोकणात पोहोचू शकतो. तसेच ७ जूनपर्यंत पुण्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात कोणताही मोठा अडथळा येण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR