मुंबई : प्रतिनिधी
देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘नीट २०२६’ ही परीक्षा अखेर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ मे रोजी पार पडलेल्या या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय आणि वाढता दबाव लक्षात घेता हा निर्णय घेतला असून या निर्णयावर आता विरोधकांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या गैरप्रकारावर सडकून टीका केली आहे. २८१ प्रश्न असलेल्या गेस पेपरमधील १३१ प्रश्न जसेच्या तसे ‘नीट’च्या प्रश्नपत्रिकेत येत असतील, तर २०२४ प्रमाणे यंदा देखील परीक्षेत पैशांचा मोठा खेळ झाला हे स्पष्ट आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात देखील असाच प्रकार एसआरएफच्या परीक्षेच्या संदर्भात देखील झाला होता. ठराविक दलालांच्या पैशाच्या खेळात विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करून त्यांच्या आयुष्याचा खेळ करणे योग्य नाही. तपास यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कठोर कारवाई करावी, अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी पेपर लीक झाल्याने नीट परीक्षा रद्द करून चौकशीचे आदेश दिल्याबद्दल एनटीएचे आभार मानले. परंतु पेपरफुटीनंतर जाग्या होणा-या यंत्रणा अगोदर नेमके काय करतात? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो, असेही ते म्हणाले. परीक्षा रद्द झाल्यावर विद्यार्थ्यांना, पालकांना होणारा मन:स्ताप लक्षात घेता, गैरप्रकार होणार नाहीत याची अगोदरच काळजी का घेतली जात नाही? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. किमान यापुढे काळजी घेतली जाईल तसेच दोषींना कठोरात कठोर शिक्षा करून चाप लावला जाईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सरकारी यंत्रणेचा हलगर्जीपणा दुर्दैवी – सुप्रिया सुळे
यावर प्रतिक्रिया देताना, हा प्रकार धक्कादायक असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या, २२ लाख मुले या परीक्षेला बसली आहेत. अशा परिस्थितीत इतके तंत्रज्ञान असताना, एआय वगैरेची चर्चा असताना दुसरीकडे एक पेपर फुटतो. २२ लाख मुलांच्या आयुष्याचा हा प्रश्न आहे. मी एक आई आहे. ज्या कुटुंबात शिक्षणाला महत्त्व असते, तिथे अशा परीक्षांमध्ये संपूर्ण कुटुंब गुंतलेले असते.

