कल्याण : प्रतिनिधी
कल्याणमध्ये काल दुपारी धक्कादायक प्रकार घडला. कल्याण एसीपी कार्यालय येथे साडेपाच फुटांचा अतिविषारी इंडियन कोब्रा शिरल्याने एकच खळबळ उडाली. कार्यालयात काम करणा-या महिला पोलिस कर्मचा-यांनी भीतीपोटी तब्बल अर्धा तास स्वत:ला खोलीत कोंडून घेतले. सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत नागाला पकडल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
कल्याण पश्चिमेतील आंबेडकर रोड परिसरात असलेल्या एसीपी कार्यालयात काल दुपारच्या सुमारास अचानक साडेपाच फुटांचा इंडियन कोब्रा शिरल्याने कार्यालयात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. नकळत कार्यालयात घुसलेल्या या अतिविषारी नागामुळे कर्मचारी घाबरले.
घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून अत्यंत दक्षतेने या अतिविषारी नागाचे रेस्क्यू केले. त्यानंतर नागाला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील प्रक्रिया पूर्ण करून त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

