Homeमहाराष्ट्रशरद पवार यांची प्रकृती स्थिर; पंतप्रधान मोदींकडून विचारणा

शरद पवार यांची प्रकृती स्थिर; पंतप्रधान मोदींकडून विचारणा

पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना प्रकृती बिघडल्याने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते, त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यात सकारात्मक सुधारणा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. शरद पवारांना ११ फेबु्रवारी रोजी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

९ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे नेते, खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. बारामतीतून पुण्यातील रुबी रुग्णालयात आणून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. बारामतीमध्ये असताना सकाळी डॉक्टरांची एक टीम शरद पवार यांची तपासणी करण्यासाठी गेली होती. त्यानंतर दुपारीदेखील पवारांच्या गोविंदबागेत डॉक्टरांची टीम गेली होती. अखेर त्यांना पुण्यात हलवण्यात आले. त्यावेळी त्यांची कन्या सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या.

शरद पवारांच्या प्रकृतीबाबत रुबी हॉल क्लिनिक कडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. पवारांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे, अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टर सायमन ग्रँट यांनी सकाळी दिली. शरद पवारांची प्रकृती आता स्थिर असून ते बरे होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. काल त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर काही उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना होत असलेला त्रास आता काही प्रमाणात कमी झाल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मात्र खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवारांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. हॉस्पिटलच्या प्रोटोकॉलनुसार शरद पवारांवर उपचार सुरू आहेत आणि त्यांच्या तब्येतीवर अतिशय बारकाईने लक्षात ठेवण्यात येत आहे असे सांगण्यात आलं. मात्र, कोणत्याही कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी हॉस्पिटलच्या आवारात गर्दी करू नये असे आवाहन रुग्णालयाकडून करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींनी फोनवरून केली विचारपूस
काल शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर त्यांना लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना सर्वच जण करत आहेत. याच दरम्यान शरद पवारांच्या तब्येतीबाबत विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला होता अशी माहिती देखील समोर आली आहे. नरेंद्र मोदी यांनी पवारांना फोन केला, त्यांच्या तब्येतीबाबत जाणून घेतले. आज सकाळी पंतप्रधानांचे फोनवरून पवारांशी बोलणे झाल्याचे समजते. दरम्यान पवारांच्या तब्येतीत सुधारणा होत असून त्यांना आज संध्याकाळी किंवा उद्या डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.

सुप्रिया सुळे यांनीही केले ट्विट
शरद पवार यांच्या तब्येतीबाबत त्यांच्या कन्येकडून, सुप्रिया सुळे यांच्याकडूनही अपडेट देण्यात आली होती. त्यांनी एक ट्विट करत अपडेट दिले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून शरद पवारांच्या उपचारांबद्दल अधिक स्पष्ट माहिती दिली. बाबांना छातीत संसर्ग झाला असून त्यांना ५ दिवसांच्या अँटीबायोटिक्सचा कोर्स पूर्ण करावा लागणार आहे. सुदैवाने, इतर सर्व शारीरिक रिपोर्टस् सामान्य आले आहेत. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल मी मनापासून आभारी आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR