Homeसंपादकीयअवकाळीनं झोडपलं!

अवकाळीनं झोडपलं!

मराठवाड्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसू शकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता, तो खरा ठरला. सोमवारी मराठवाड्याच्या हवामानात बदल झाला. काही भागात ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली, तर लातूर व नांदेड जिल्ह्याला मंगळवारी संध्याकाळी अवकाळी पावसाने झोडपून काढले. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात सायंकाळी काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला, गारपीट झाली. लातूरमध्येही सुमारे अर्धा तास पाऊस झाला, गाराही पडल्या. जोरदार वा-यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या. काही भागात वीजपुरवठाही खंडित झाला. अवकाळी पावसाने शेतक-यांची दैना उडवली. गहू, हरभरा, ज्वारी, भाजीपाला आदी पिकांना जोरदार फटका बसला. निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी भागात वादळी वा-यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. औराद शहाजनी, तगरखेडा, सावरगाव, हलगरा, माने जवळगा, शेळगी आदी भागात जोरदार वा-यामुळे पिके आडवी झाली. १८ ते २० मार्च दरम्यान लातूर-धाराशिवसह मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देगलूर तालुक्यातील हाणेगाव परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.

वीज कोसळून शेतात काम करणा-या दीपिका पवार हिचा जागीच मृत्यू झाला. सध्या राज्यातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेल्यामुळे हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्यामुळे दुपारी किंवा संध्याकाळी वादळी पाऊस हजेरी लावू शकतो. उत्तर भारतातून येणारा पश्चिमी विक्षोभ आणि बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्या संयोगामुळे महाराष्ट्राच्या हवामानात बदल झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत १८ व १९ मार्च रोजी पावसाचा अधिक जोर राहण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने या भागासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ तसेच सोलापूर, सांगली, सातारा येथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या कृषी विभागाने शेतक-यांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. काढलेला शेतमाल ताडपत्रीने झाकून ठेवावा किंवा सुरक्षित स्थळी हलवावा. तसेच बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणलेला माल पावसात भिजणार नाही याची काळजी घ्यावी. पाऊस सुरू असताना झाडाखाली किंवा उघड्यावर आश्रय घेणे टाळावे, कारण वीज पडण्याचा धोका असतो. मराठवाड्याला अवकाळीचे दुष्टचक्र पुन्हा एकदा भोगावे लागत आहे.

वातावरणातील बदलाचा परिणाम रबी हंगामातील पिकांवर होत असून लातूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. खरिपात अतिवृष्टीने उत्पादनात घट झाली, रबीत पेरण्या लांबणीवर गेल्या आणि आता पीक हाता-तोंडाशी आले असताना अवकाळी पावसामुळे शेतक-यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात गत काही दिवसांपासून हरभरा, ज्वारी, गहू पिकांची काढणी सुरू आहे. अवकाळी पावसामुळे या पिकांचे नुकसान झाले असून आंबा, द्राक्ष या फळपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. मार्चच्या मध्यावर उष्णतेचा तडाखा वाढल्यानंतर आता राज्यावर हवामानाचे नवे संकट उभे आहे. हवामान विभागाने वादळी वा-यासह अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा दिला होता. गत आठवड्यात तापमानाने चाळिशी पार केल्याने नागरिकांना उष्णतेच्या लाटांचा त्रास सहन करावा लागला. आता हवामानात अचानक बदल होत असल्याने मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यासह राज्यात अनेक भागात तापमानाचा पारा ४० अंशाच्या वर पोहोचला आहे. येत्या चार ते पाच दिवसांत महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे.

१८ ते २० मार्च दरम्यान धाराशिवसह मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे. गुढीपाडव्याला मराठी नववर्ष सुरू होते. नववर्षाच्या स्वागताला अनेक ठिकाणी शोभायात्रेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या सर्व कार्यक्रमांवर पावसाचे सावट असणार आहे. कडक उन्हाचा चटका काही दिवसांपासून वाढला आहे. उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मार्च महिन्यापासूनच उष्णतेचे चटके बसत असल्याने लोक हवालदिल झाले आहेत.राज्यामध्ये दोन विरुद्ध दिशांनी वाहणा-या वा-यांच्या स्थितीमुळे आणि वातावरणातील बदलांमुळे अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम म्हणून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई, ठाणे आणि पालघर पट्ट्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुढीपाडव्यादिवशी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भालाही यलो अलर्ट आहे. मराठवाड्यात परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव येथे यलो अलर्ट आहे.

सोलापुरातही गुरुवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या मराठवाड्यापासून तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, त्यामुळे राज्यात पावसासाठी पूरक स्थिती पहावयास मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरही पाऊस अपेक्षित आहे. गत २४ तासांत अमरावती येथे राज्यातील सर्वोच्च तापमानाची (४१.८अंश) नोंद झाली असून विदर्भ आणि मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यात जिल्हा परिषद प्रशासनाने १६ मार्चपासून शाळांच्या वेळेत बदल केला आहे. आता या शाळा सकाळी ७ ते दुपारी १२.३० या वेळेत भरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने वायुप्रदूषण वाढले आहे. श्वसनाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR