Homeसंपादकीयअ‍ॅन्ग्री यंग वूमन!

अ‍ॅन्ग्री यंग वूमन!

महानायक अमिताभ बच्चनचे सुरुवातीच्या काळात त्याच्या अदाकारीचे ‘अ‍ॅन्ग्री यंग मॅन’असे कौतुक झाले. या बाबतीत महिलाही मागे नाहीत हे परवा वरळीत दिसून झाले. मुंबईतील वरळी परिसरात भाजपच्या मोर्चादरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीमुळे एका संतापलेल्या महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना जाहीरपणे सुनावले. महिला आरक्षणाच्या मुद्यावर आयोजित मोर्चात १५ ते २० हजार महिला सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. दरम्यान आपल्या मुलाला आणण्यासाठी निघालेली महिला वाहतूक कोंडीत अडकल्याने तिने मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जाऊन संताप व्यक्त केला. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने दिलगिरी व्यक्त केली. मंत्री गिरीश महाजन यांनी मान्य केले की वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास झाला. महिलेची भाषा अयोग्य असली तरी तिचा राग रास्त होता, असे सांगत त्यांनी या प्रकरणी महिलेवर कारवाई करू नये असे पोलिसांना सांगितले. दरम्यान, महापौर रितू तावडे यांनीही या गैरसोयीबद्दल मुंबईकरांची माफी मागितली. वरळी पोलिसांनी मोर्चाच्या आयोजकांविरोधात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ठाकरे सेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी या महिलेच्या धाडसाचे कौतुक करत भाजपवर टीका केली. सामान्य जनतेला वेठीस धरून भाजप राजकीय इव्हेंटबाजी करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांच्या टीकेला प्रतिउत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, विरोधक मोर्चे काढत नाहीत का? खरे तर सारेच मोर्चे काढत असतात. परंतु आपण जे काही करत आहोत त्याचा सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याचे भान कोणीच ठेवत नाही ही वस्तुस्थिती आहे.

वर्षभर अनेक पक्ष, संस्था, धर्म आपले कार्यक्रम, उत्सव, जयंत्या-मयंत्या साजरे करत असतात. यावेळी जो उन्माद व्यक्त होत असतो, त्याची झळ सर्वसामान्यांना बसणार नाही याची काळजी घेतली जात नाही हे कटु सत्य आहे. आपल्या मुलाला आणण्यासाठी निघालेल्या महिलेने वरळीत रहदारीला अडथळा निर्माण झाल्याबद्दल जो त्रागा व्यक्त केला तो इतिहासकाळात हिरकणीने गडतटावरून मारलेल्या उडीच्या तोडीचा होता. लोकसभा अधिवेशनात महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाले म्हणून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षांविरुद्ध देशभरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईत भाजपकडून ‘जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चादरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांना एका सामान्य महिलेच्या तीव्र संतापाचा आणि प्रश्नांचा भडिमार सहन करावा लागला. या घटनेचे व्हीडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. यावेळी त्या महिलेने जो आक्रोश व्यक्त केला तो ‘जनआक्रोश मोर्चा’ला खाऊन टाकणारा होता.

बिचारी महिला तासाभरापासून रहदारीत अडकली होती. रहदारीतील अडथळ्यांचा रोष, संताप या महिलेच्या मुखातून आग ओकत होता. रहदारीची समस्या आता छोट्या शहरांतही भेडसावू लागली आहे. मुंबईतील मोर्चा वरळीतील जांबोरी मैदानातून सुरू होऊन वरळीतीलच एनएससीआय डोमपर्यंत काढण्यात आला होता. मोर्चासाठी मोठ्या संख्येने महिला जमल्यामुळे (की जमवल्यामुळे?) जांबोरी मैदान आणि परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. ऐन कामाच्या वेळेत रस्ते रोखले गेल्याने प्रवाशांचे व स्थानिक नागरिकांचे हाल झाले. या वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका महिलेचा संयम सुटला आणि तिने थेट मोर्चाचे नेतृत्व करणा-या गिरीश महाजनांना गाठून जाब विचारला. महिलेने मंत्र्यांसमोर उभे राहून राजकीय आंदोलनामुळे सर्वसामान्यांना होणा-या त्रासाबद्दल तीव्र निषेध नोंदवला. तुमच्या या मोर्चामुळे आम्हाला तासन्तास वाहतूक कोंडीत का अडकून राहावे लागते? असा थेट सवाल तिने केला. गिरीश महाजन यांनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्या महिलेचा संताप शांत होत नव्हता. ‘तुमचं हे काय चाललंय?’ इथून चालते व्हा (गेट आऊट फ्रॉम हियर) अशा आक्रमक भाषेत त्या महिलेने महाजनांसमोर आपला रोष व्यक्त केला. जणू काही तिने सर्वसामान्यांच्या त्राग्याला वाचा फोडली! वरळीत निघालेल्या या मोर्चामुळे शेकडो वाहने रस्त्यात अडकून पडली होती. कामावर जाणारे नागरिक आणि संतापलेल्या महिलेने महाजनांना विचारले की, तुमच्या या मोर्चामुळे शेकडो लोक इथे तासन्तास अडकून पडले आहेत. जर तुम्हाला कोणाचा निषेध किंवा विरोध करायचा असेल तर तो एखाद्या मैदानात जाऊन करा, अशा प्रकारे रस्ते अडवून सर्वसामान्यांना वेठीस का धरत आहात? यावेळी केवळ मंत्र्यावरच नव्हे तर तिथे उपस्थित असलेल्या पोलिस प्रशासनावरही त्या महिलेने प्रश्नांचा भडिमार केला. इतकी भीषण वाहतूक कोंडी झाली असताना तुम्ही केवळ बघ्याची भूमिका का घेत आहात? असा सवाल तिने पोलिसांना केला. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे सत्ताधारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते निरुत्तर झाले होते.

राजकीय अजेंडा राबवताना सर्वसामान्य मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्यावर होणा-या परिणामाचे वास्तव या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. एका बाजूला महिलांच्या हक्कासाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे सांगितले जात असतानाच दुसरीकडे एका महिलेने आपल्या हक्कासाठी आणि त्रासासाठी मंत्र्यांना भररस्त्यात सुनावल्याने या मोर्चाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता या ‘जनआक्रोश’ मोर्चाला कायदेशीर वळण लागले आहे. या मोर्चादरम्यान वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणे आणि प्रशासकीय अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोर्चा आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा रोखून जाब विचारल्यानंतर हा मोर्चा चर्चेत आला. ब्राव्हो, अ‍ॅन्ग्री यंग वूमन!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR