39.2 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeनांदेडआजपर्यंत पक्षीय वाद : खा. चव्हाण

आजपर्यंत पक्षीय वाद : खा. चव्हाण

नांदेड : विशेष प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व आजी – माजी आमदार व खासदारांना चव्हाणांनी चहापानासाठी शासकीय विश्रामगृहात निमंत्रित केले होते. याप्रसंगी ते म्हणाले की, आजपर्यंत पक्षीय वाद होता परंतु आज आपण एकत्रित आलो आहोत. नांदेडची लोकसभा यापूर्वीही भाजपची होती आणि भविष्यातही भाजपचीच राहील या अनुषंगाने आपल्या सर्वांना काम करून भाजप पक्ष मजबूत करायचा आहे, असे मत त्यांनी बैठकीत व्यक्त केले.

नव्यानेच राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेलेले खा.अशोकराव चव्हाण यांनी शनिवारी सायंकाळी जिल्ह्यातील सर्वच भाजपमधील मातब्बर पदाधिकारी व नेत्यांना निमंत्रित केले होते. या बैठकीत संवाद साधताना ते पुढे म्हणाले की, पुढील काळात भाजपाला अधिक मजबूत करण्यासाठी संवाद व समन्वयाची गरज आहे. त्यामुळे ही एक उत्तम सुरूवात आहे. ही सुरुवात आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवावी. भारतीय जनता पार्टी आता नांदेड जिल्ह्यात मजबूत करण्याच्या अनुषंगाने आपण सर्वांनी अंतर्गत मतभेद विसरून कामाला लागले पाहिजे.

अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ते यावेळी चर्चा करीत होते. भविष्यात आपण पक्षासाठी रणनिती आखून काम करूत. प्रत्येकाला तेवढाच सन्मान देऊन मोदींच्या विकासात्मक दृष्टिकोनाला प्रतिसाद देऊ. आज ५५ आजी – माजी नगरसेवक आले असले तरी भविष्यात अजून अनेक जण आपल्यासोबत काम करतील, असेही ते म्हणाले. या बैठकीसाठी जिल्ह्यातील आजी -माजी आमदारांनी उपस्थिती लावली होती. खा.प्रताप पाटील चिखलीकर उपस्थिती लावतील की नाही, याबाबत साशंकता असतानाच त्यांनी उपस्थिती दर्शवून सर्वांची मने जिंकली. खा.चिखलीकर विश्रामगृहावर येताच, असेच एकत्रित राहा, नांदेडचा विकास निश्चितच होईल, असा टोमणादेखील एका बड्या नेत्यांने यावेळी लगावला.

या बैठकीसाठी माजी मंत्री सूर्यकांता पाटील, डॉ.माधवराव किन्हाळकर, भास्करराव पाटील खतगावकर, आ.राजेश पवार, आ.राम पाटील रातोळीकर, खा.अजित गोपछडे, जिल्हाध्यक्ष संतुक हंबर्डे, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, ओमप्रकाश पोकर्णा, आ.भीमराव केराम, डॉ.तुषार राठोड, अमरनाथ राजूरकर, सुभाष साबणे, प्रविण साले, भाजप प्रदेश सचिव देवीदास राठोड, चैतन्य बापू देशमुख, प्रविण साले, किशोर स्वामी, श्रावण भिलवंडे यांच्यासह प्रमुख पदाधिका-यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR