39.2 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeनांदेड‘रुद्रा’च्या मिसळला ग्राहकांची पसंती

‘रुद्रा’च्या मिसळला ग्राहकांची पसंती

नांदेड : रुळलेल्या पायवाटांपेक्षा स्वत:ची वेगळी वाट निर्माण करणा-यांना यश मिळते ही उक्ती सार्थ ठरवलीय नांदेडच्या सचिन भवरे याने! एवढेच नाही तर व्यवसायात यश मिळाल्यानंतर दुसरी शाखा सुरू करून खवय्यांना मिसळीच्या चवीतून तृप्त करण्याचा उद्योग सचिन भवरे यांनी भरभराटीला आणला असून दिवसाकाठी १५० ते २०० प्लेट मिसळपाव ते विकतात. डीएमएलटी पदवी संपादन केलेले सचिन भवरे हे पुणे येथे नोकरी करीत होते. परंतु साचेबद्ध काम आणि नवीन काहीतरी करण्याची इच्छा त्यांच्या मनात रुंजी घालत होती.

पाककलेची आवड असल्याने आवडीचे रुपांतर व्यवसायात करण्याचे धाडस त्यांनी केले. नांदेड शहरातील विनायकनगर येथे सप्टेंबर २०२२ मध्ये ‘रुद्रा मिसळ अँड वडापाव’ या नावाने उद्योग त्यांनी सुरू केला. पाककलेची आवड असलेल्या रोहिणी कांबळे यांची व्यवसायात मदत घेत आपली वाटचाल सुरू केली. नंतर हळूहळू पुणेरी मटकी, भेळ, वडापाव, वडा रस्सा आदी पदार्थांची विक्री सुरू केली. मिसळीसाठी लागणारे सर्व मसाले व मटकी घरीच तयार होत असल्याने चवीबरोबरच खवैय्यांच्या मागणीप्रमाणे मिसळीचा दर्जा सुधारत नेला. नाशिकच्या मिसळीची चव सर्वांना भावते हे लक्षात आल्यानंतर ती चव देण्यात सातत्य ठेवले. त्यामुळे अल्पावधीत व्यवसायात प्रचार मोठ्या प्रमाणात झाला आणि दूरदुरून ग्राहक आपल्याकडे येत असल्याचे सचिन भवरे सांगतात.

नाशिकच्या मिसळीचा स्वाद देण्यात सातत्य आणि ग्राहकांच्या पसंतीला उतरलेली सेवा यामुळे दीड वर्षातच भरभराट झाली आणि यामुळेच नवीन शाखा सुरू करण्याचा विचार पुढे आला. विनायकनगर व नवा मोंढा अशा दोन ठिकाणी स्वतंत्रपणे मिसळपाव विक्रीचा उद्योग सुरू करून त्याच्या जोडीला हळूहळू पुणेरी मटकी, भेळ, वडापाव, वडा रस्सा आदी पदार्थ विक्रीची जोड देण्यात आली आहे. आज ठिकठिकाणी नवनवे पाककलेत प्रयोग केले जातात. परंतु ग्राहकांना काय हवे याचा अभ्यास आपण प्रारंभीच केल्याने व्यवसायात उतरल्यानंतर फारसे अवघड गेले नाही.

आता दोन्ही शाखांमधून दररोज १५० ते २०० प्लेट मिसळपाव विक्री होते. अन्य डिशेशपेक्षा मिसळीला जास्त ग्राहक असल्याचे भवरे सांगतात. या डिशसोबत दही, पापड, कांदा, काकडी, रस्सा देण्यात येतो. यातून १०० डझन पाव तर १००० ते १५०० वडापावची विक्री होते. व्यवसायाच्या तयारीसाठी सकाळपासूनच दिनचर्येला सुरूवात होते. तत्पूर्वी सकाळी ५.३० वा. सचिन भवरे पेपरविक्रीसाठी बाहेर पडतात. सद्यस्थितीत ते १५० ते २०० अंकांचे वाटप करून दुस-या टप्प्यातील व्यावसायिक तयारीला लागतात. त्यामुळे व्यवसायात परिश्रम केले तरच यश मिळते. यशाला शॉर्टकट नाही, हे सत्य स्वीकारून आपण वाटचाल सुरू केल्याचे ते म्हणतात. आजघडीला सचिन भवरे यांच्या दोन्ही शाखांमध्ये खवय्यांची मोठी गर्दी दिसून येते. नांदेडमध्ये अन्य कुठल्याही ठिकाणापेक्षा ‘रुद्रा मिसळ अँड वडापाव’ येथील चव ग्राहकांना भावणारी असल्याने पाककलेची आवड जोपासणा-या तरुणांसाठी भवरे यांची ही वाटचाल प्रेरणादायक ठरणारी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR