35.6 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeनांदेडकर्मचारी साहित्यासह केंद्राकडे रवाना

कर्मचारी साहित्यासह केंद्राकडे रवाना

नांदेड : प्रतिनिधी
नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी उद्या दि. २६ रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यात २ हजार ६८ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी साहित्य घेऊन कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर आज २५ एप्रिल रोजी सकाळपासूनच रवाना झाले. तर दुपारपर्यंत अनेक कर्मचारी मतदान केंद्रावर पोहचले आहेत.

नांदेड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रातून पोलिंग पार्ट्या गुरुवारी सकाळी ७ वाजेपासूनच रवाना होण्यास प्रारंभ झाला आहे. नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण क्षेत्रात नियुक्त कर्मचारी नांदेड शासकीय तंत्रनिकेतन परिसरातून रवाना होत आहेत. शासकीय तंत्रनिकेतन परिसरात निवडणूक कर्मचारी आपल्या नेमणुकीचे आदेश, निवडणूक साहित्य प्राप्त करून आपल्या मतदान केंद्रकडे रवाना झाले. नांदेड लोकसभा मतदारसंघात नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, नायगाव, देगलूर आणि मुखेड या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात १८ लाख ५१ हजार मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.

यामध्ये ९ लाख ५५ हजार ८४ पुरुष मतदार तर ८ लाख ९६ हजार ६१७ महिला मतदार आणि १४२ तृतीयपंथी मतदार समाविष्ट आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये २ हजार ६८ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या मतदान केंद्रामध्ये मतदान प्रक्रियेसाठी १० हजार ६३७ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये केंद्राध्यक्ष २ हजार ७६६, इतर मतदान अधिकारी ७ हजार ९२१, क्षेत्रीय अधिकारी २४२ याशिवाय मायक्रो ऑब्जरवर ३९ अशा विविध अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नांदेड लोकसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांसह २३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर मतदान कर्मचा-यांचे शेवटचे आणि महत्त्वपूर्ण प्रशिक्षण सहाय्यक निवडणूक अधिका-यांच्या उपस्थितीत २४ एप्रिल रोजी पार पडले.

दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी साहित्‍य वितरण केंद्राला भेट देवून कर्मचा-यांशी संवाद साधला. तत्‍पुर्वी पत्रकारांशी संवाद साधताना त्‍यांनी नांदेड लोकसभा मतदार संघासाठी ७५ टक्‍के मतदानाचे उद्दिष्‍ट प्रशासनाने घेतले असून हे उदिष्‍टपूर्ती करण्‍यासाठी मतदारांनी मोठया प्रमाणात बाहेर पडून मतदान करावे असे आवाहन केले. १० हजारावर कर्मचारी व १५ दिवसापासून दिवसरात्र कर्मचा-यांची मेहनत लोकशाहीचा उत्‍सव साजरा करण्‍यासाठी लागली आहे. प्रत्‍येक मतदान केंद्रावर सर्व सोयी करण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यामुळे मोठया संख्‍येने नागरिकांनी बाहेर पडण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR