35 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeनांदेडदेशात हुकुमशाहीविरोधात लाट; पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलतील

देशात हुकुमशाहीविरोधात लाट; पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलतील

भोकर : प्रतिनिधी
सध्या देशात हुकुमशाहीविरोधात लाट उसळली आहे. हे पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलतील, अशी भीती सर्वांच्या मनात आहे. तसे सर्वच वर्गात असंतोष आहे. शेतकरी स्वत: होऊन सांगत आहे की, आमची मते महाविकास आघाडीलाच देणार आहोत. शेतकरी म्हणतात की, मोदी सरकार आता संकटात आहे त्यामुळे नांदेड लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना आपले अमूल्य मत देऊन सत्ताधा-यांना पायउतार करा, असा घणाघात शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी भोकर येथील पत्रपरिषदेत केला. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील यांच्या प्रचारासाठी ते भोकर येथे आले होते. त्यानंतर त्यांची सभा हदगाव येथे पार पडली. या पत्रपरिषदेस नांदेडचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदी सरकारने संकटाच्या काळात साथ देणा-या शिवसेनेच्या सातबारावर गद्दाराचे नाव लिहिले, ते पुन्हा सत्तेत आले तर आमच्या सातबा-यावर उप-याचे नाव लिहिले तर आम्ही कोणाकडे जायचे, अशी भीती शेतक-यांमधून व्यक्त होत आहे. सर्वसामान्य जनतेची आणि शेतक-यांची व्यथा यावेळी त्यांनी मांडली. भाजपच्या हुकुमशाहीवर कडाडून हल्ला चढवला. जनता आता भाजपच्या हुकुमशाहीला त्रस्त आहे. जनतेत भाजपविरोधात प्रचंड रोष आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकणार असा विश्वासही ठाकरे यांनी बोलून दाखविला. आमची आणि मित्र पक्षाची इच्छा होती, नांदेडमध्ये सभा घ्यावी पण वेळेची अडचण लक्षात घेता ती सभा आम्ही घेऊ शकलो नाहीत. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. राज्यात काही जणांनी गद्दारी केली. ती गद्दारी झाली नसती तर महाविकास आघाडी सरकार राज्याला पुढे घेऊन गेले असते. २०१९ मध्ये आम्ही निवडणुका वेगवेगळ्या लढवून नंतर एकत्र आलो आहोत.

आता आम्ही एकत्रित निवडणुका लढवित आहोत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच विजय होणार आहे. महाविकास आघाडीत एकजूट आहे. मित्र पक्षाचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अशी एकजूट असल्याने आमचा विजय निश्चित आहे. आजघडीला शिवसेनेला ते नकली सेना म्हणत असतील तर शेतक-यांनाही नकली शेतकरी म्हणतील, अशी भीती आम्हाला आहे. आमची जमीन चोरतील, हा मोठा धोका आहे. अशी भीती ठाकरे यांनी व्यक्त केली. गेल्या दहा वर्षातील त्यांचा नाकर्तपणा उघड झाला आहे. त्यांची हुकुमशाही वाढत आहे. सुरतमध्ये जादू झाली. भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडन्ूा आला. देशात अशी जादू सुरू आहे. अशी जादू सुरू राहिली तरी सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी कसा राहणार, असा सवाल शेतक-यांचा आहे. यावर महाराष्ट्रात महाविकास आणि देशात इंडिया आघाडीवर हे उत्तर आहे. असे शेतक-यांनीच ठरविले आहे. त्यामुळे ४ जून रोजी ज्या दिवशी निकाल जाहीर होतील त्या दिवशी महाराष्ट्राचे निकाल हे महाविकास आघाडीच्या पारड्यात राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR