32.6 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeनांदेडभाविकांच्या टेम्पोला माहूरगड घाटात अपघात

भाविकांच्या टेम्पोला माहूरगड घाटात अपघात

श्रीक्षेत्र माहूर : प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातून माहूरगड मार्ग चंद्रपूर येथील महाकाली माता यात्रेसाठी जाणा-या भाविकांच्या टेम्पोला रेणुका मातेचे दर्शन घेऊन परत येत असताना घाटातील शेवटच्या वळणावर अपघात घडला. पुढील वाहनास धडक बसू नये या नादात मठावरील छतावर आदळून टेम्पो दरीत न कोसळता जागेवर अडकला. यामुळे टेम्पोतील ३० भाविक बचावले. ही घटना दि.२५ रोजी सकाळी घडली. या अपघातामधून देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती भाविकासह माहूरकरांना आली.

चंद्रपूर येथील श्री महाकाली मातेच्या यात्रेनिमित्त गेल्या पंधरा दिवसांपासून लाखो भाविक माहूरगडावर दर्शनासाठी मिळेल त्या वाहनाने येत आहेत. दि. २५ रोजी सकाळी सहा वाजता कावी ता. जिंतूर जि. परभणी येथून चालक तुकाराम प्रल्हाद लिपणे हा कोल्हावाडी जि. परभणी येथील आपले सगेसोयरे ज्यामध्ये पंधरा पुरुष, दहा महिलांसह पाच लहान मुलांना घेऊन टाटा पिक अप या मालवाहू एम एच ४३ एफ ८९७२ या वाहनाने चंद्रपूर महाकाली यात्रा जाण्यासाठी निघाले. रस्त्यात श्री रेणुका माता आणि श्री दत्त शिखर संस्थांनचे दर्शन घेऊन पुढे जायचे होते. येथे दर्शन झाल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता माहूरगडचा घाट उतरतांना निळकंठेश्वर मंदिरा जवळील शेवटच्या घातक वळणावर समोरून अचानक आलेल्या वाहनाला वाचवण्याचा चालकाने प्रयत्न केला. तेव्हा वेगातील टेम्पो घाटात उंच असलेल्या मठाच्या इमारतीकडे वळवला. तेव्हा सदरील टेम्पो इमारतीच्या सज्जावर जाऊन अडकला. यामुळे टेम्पो ४० फूट खोल दरीत पडण्यापासून वाचल्याने सर्वच भाविक बालंबाल बचावले.

अपघात होताच अन्य भाविकांनी तात्काळ टेम्पोमधील महिला, पुरुष आणि लहान मुलांना सुखरूप बाहेर काढले. सुदैवान कुठल्या ही भाविकाला दुखापत झाली नसल्याचे आढळून आले. काही नागरिकांनी सदरील घटना पोलिसांना कळविल्याने सपोनी शिवप्रकाश मुळे, पोउपनि आनंदराव वाठोरे, पोहेकॉ गजानन चौधरी, पोकॉ पवन राऊत यांनी घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना सुरक्षित स्थळी हलवून नागरिकांच्या मदतीने पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था केली. घटनेचे ठिकाण अतिशय गंभीर असून या ठिकाणी अनेक मोठमोठे अपघात होऊन नागरिकांचे जीव गेले आहेत. यामुळे या घातक वळणांचे सरळीकरण करावे अशी मागणी भाविकांतून होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR