Homeसंपादकीयआता आरपारची लढाई!

आता आरपारची लढाई!

मध्य पूर्वेतील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली असून इराणसोबतचा संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेने या भागात साडेतीन हजारांहून अधिक सैनिक तैनात करण्याची प्रक्रिया गतिमान केली आहे. यात अडीच हजार मरीन सैनिकांना घेऊन जाणारी आधुनिक युद्धनौका ‘यूएसएस त्रिपोली’ आधीच आपल्या कार्यक्षेत्रात दाखल झाल्याचे सांगण्यात आले. पेंटागॉन सध्या इराणमध्ये आठवडाभर चालणा-या जमिनीवरील मोहिमेची तयारी करत असल्याचे वृत्त आहे.

जपानमध्ये तैनात असलेली ‘यूएसएस त्रिपोली’ ही अत्याधुनिक युद्धनौका असून ती एफ-३५ सारखी स्टेल्थ फायटर जेट्स आणि ऑस्प्रे विमाने वाहून नेण्यास सक्षम आहे. या शिवाय सॅन दिएगो येथून ‘यूएसएस बॉक्सर’ आणि इतर नौदलाच्या तुकड्यादेखील आखातात पाठवण्यात आल्या आहेत. ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ अंतर्गत २८ फेब्रुवारीपासून आतापर्यंत ११ हजारांहून अधिक लक्ष्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ म्हणाले की, जमिनीवर सैन्य न उतरवता उद्दिष्ट्ये साध्य करण्याचा वॉशिंग्टनचा प्रयत्न आहे मात्र अध्यक्ष ट्रम्प कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज आहेत. सौदी अरेबियातील ‘प्रिन्स सुलतान एअर बेस’वर इराणने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे केलेल्या हल्ल्यात अमेरिकेचे किमान १० कर्मचारी जखमी झाले त्यामुळे तणाव अधिकच वाढला आहे. येमेनच्या इराण समर्थक हुती बंडखोरांनी इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्र डागल्याची जबाबदारी स्वीकारल्याने हे युद्ध अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. यामुळे सुएझ कालव्याकडे जाणा-या ‘बाब अल-मंदेब’ या महत्त्वाच्या सागरी मार्गाच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूक आणि विमान मार्ग आधीच विस्कळीत झाले असून अनेक देश पर्यायी मार्गाचा शोध घेत आहेत. इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम रोखण्यासाठी आणि सागरी मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेने युद्धविरामाचा प्रस्ताव मांडला होता; पण तेहरानने हा प्रस्ताव फेटाळला असून त्या ऐवजी नुकसानभरपाई आणि सार्वभौमत्वाला मान्यता देण्याची मागणी केली आहे. नव्या खेळाडूंच्या एन्ट्रीमुळे आणि राजनैतिक चर्चा फिस्कटल्यामुळे या भागात मोठ्या प्रादेशिक अस्थिरतेचा धोका निर्माण झाला आहे. अमेरिका व इस्रायलने तेहरानमधील विद्यापीठावर हल्ला केल्याने इराण चवताळला असून त्याने थेट धमकी देताना म्हटले की, आमच्या एका विद्यापीठावर हल्ला केला तर आम्ही त्यांची दोन विद्यापीठे बेचिराख करून टाकू. अमेरिका आणि इस्रायलने जाणूनबुजून इराणी विद्यापीठे आणि संशोधन केंद्रांवर हल्ले केले आहेत. विद्यापीठे, संशोधन केंद्रे, ऐतिहासिक स्मारके आणि नामवंत शास्त्रज्ञांना पद्धतशीरपणे लक्ष्य करून इराणचा वैज्ञानिक पाया आणि सांस्कृतिक वारसा खिळखिळा केला जात आहे.

या हल्ल्यांना आम्ही आता प्रत्युत्तर देणार, अशी इराणची भूमिका आहे. इराणमधील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांवर हल्ले करून इराणच्या भविष्याला लक्ष्य केले जात आहे. या हल्ल्यांमधून पायाभूत सुविधांचा नाश करून इराणच्या वर्तमानाला आणि ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. या हल्ल्यानंतरही आम्ही अटल आणि अभेद्द राहू असे इराणने म्हटले आहे. आम्ही आखातातील अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित विद्यापीठांना लक्ष्य करू. या भागातील अमेरिकन विद्यापीठांचे सर्व कर्मचारी, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच आसपासच्या नागरिकांनी विद्यापीठांच्या परिसरापासून १ किलो मीटर दूर रहावे असा सल्ला इराणने दिला आहे. इराणविरोधात नाहक आखाती युद्ध छेडणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात जनतेचा रोष वाढत असून अमेरिका व युरोपच्या रस्त्यावर ‘नो किंग्ज’ रॅलीच्या माध्यमातून सुमारे ९० लाख लोकांनी निदर्शने केली. या आंदोलनाचे मुख्य केंद्र मिनेसोटा होते. सेंट पॉल आणि मिनेसोटा कॅपिटलच्या मैदानावर आणि आसपाच्या रस्त्यांवर लाखो लोक जमले होते. काहींनी अमेरिकेचे झेंडे हातात उलटे धरले होते.

हे मोठ्या संकटाचे लक्षण मानले जाते. प्रसिद्ध गायक ब्रूस स्प्रिंगस्टीन हे या रॅलीचे मुख्य आकर्षण होते. त्यांनी ‘स्ट्रीट ऑफ मिनीपोलिस’ हे गाणे सादर केले. रेनी गुड आणि लेक्स प्रेटी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि ट्रम्प प्रशासनाच्या आक्रमक इमिग्रेशन धोरणांविरुद्ध रस्त्यावर उतरलेल्या लोकांच्या सन्मानार्थ त्यांनी हे गाणे लिहिलेले होते. वॉशिंग्टनमध्ये शेकडो लोकांनी लिंकन मेमोरियल समोरून नॅशनल मॉलपर्यंत मोर्चा काढला. त्यांच्या हातात ‘विदुषका, राजमुकूट खाली ठेव’ असे लिहिलेले फलक होते. ‘राजा नको’ अशा घोषणाही दिल्या गेल्या. ही निदर्शने न्यूयॉर्कपासून छोट्या शहरापर्यंत पसरली. ५० राज्यांमध्ये ३१०० हून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सुमारे ९० लाख लोक यात सहभागी झाले होते. सॅन दिएगो येथे सुमारे ४० हजार लोकांनी मोर्चा काढला. आंतरराष्ट्रीय स्तरावर लंडन, पॅरिस आणि रोममध्येही निदर्शने झाली. रोममध्ये हजारो लोकांनी पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या विरोधात आणि इराणवरील हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.

ट्रम्प विरोधक अमेरिकी जनतेचा उद्रेक पाहता ट्रम्प प्रशासनाचा अन्त जवळ आला आहे, असे दिसते. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत होणा-या मध्यावधी निवडणुकांमध्ये या जनक्षोभाचा फटका बसू शकतो. ट्रम्प सरकारच्या अनेक धोरणांवर अमेरिकन जनता नाराज आहे. त्यांचा राग विशेषत: इराणसोबत वाढलेला तणाव, कठोर इमिग्रेशन आणि वाढत्या महागाईबद्दल आहे. अनेक ठिकाणी लोकांनी ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या विरोधात पोस्टर्स दाखवले आणि त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. केवळ इमिगे्रशनच नाही तर इराणमधील युद्ध, ट्रान्सजेंडर हक्कांची कपात आणि अब्जाधिशांची आर्थिक मक्तेदारी या विरुद्धही लोकांनी आवाज उठवला. अमेरिकेत शांततापूर्ण निदर्शनांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. आयोजकांच्या अंदाजानुसार जूनमधील रॅलीत ५० लाख, ऑक्टोबरमध्ये ७० लाख लोक सहभागी झाले होते. या वेळी ८० लाखांवर लोक या आंदोलनात सहभागी झाले. आंदोलकांनी ट्रम्प यांची ‘बेबी’ म्हणून आणि ‘बेडूक राजा’ अशी थट्टा करणारे वेश परिधान केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR