स्वत:ला नौदलाचा माजी ‘कॅप्टन’ म्हणवून घेणा-या सिन्नर तालुक्यातील श्री शिवनिका संस्थानचा अध्यक्ष अशोक खरात याला महिलेवरील अत्याचार प्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने अटक केली. बुधवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्याच्या कार्यालयातून ५८ आक्षेपार्ह चित्रफिती जप्त केल्या. खरात हा भविष्य सांगत असल्याने त्याच्याकडे अनेक बड्या राजकीय नेत्यांसह इतर सर्वच क्षेत्रांतील मातब्बरांचा राबता होता. २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे तसेच इतर सहका-यांसह शिवनिका संस्थानच्या मंदिरात पूजा केली होती. तेव्हापासून खरात हा अधिक प्रकाशझोतात आला. अशोक खरातवर एका ३५ वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याच आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार अशोक खरात लोकांचे भविष्य सांगण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी जवळिक साधत होता. स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून तो तंत्र-मंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली लोकांचा विश्वास संपादन करत होता. त्याने तक्रारदार महिलेला आपल्या कार्यालयात बोलावून तिला गुंगीचा पदार्थ दिला आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
हा प्रकार २०२२ पासून डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे. खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी असून त्याने सुमारे २२ वर्षे सेवा केली आहे. अध्यात्म, अंकशास्त्र आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून त्यांचे लैंगिक शोषण करणा-या अशोक खरात ऊर्फ ‘कॅप्टन’ याच्या अटकेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून कॅमडा कॉर्नर येथील खरातच्या ‘ओक्स प्रॉपर्टीज’या कार्यालयाची कसून झडती घेतली. या झडती दरम्यान एक महत्त्वाचा पेन ड्राईव्ह हाती लागला आहे. या पेन ड्राईव्हमध्ये तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हीडीओ असल्याचे समोर आले आहे. या व्हीडीओमध्ये पीडित महिलांशी संबंधित काही संवेदनशील चित्रीकरण असण्याची दाट शक्यता आहे. खरातने हे व्हीडीओ महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा स्वत:च्या विकृत आनंदासाठी तयार केले होते का याचा शोध पोलिस घेत आहेत. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नातील अडथळे दूर करण्याच्या बहाण्याने खरातने तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केले. ‘हे विधी पवित्र आहेत आणि ते न केल्यास तुझ्या पतीचा जीव जाईल’ अशी भीती घालून त्याने गत तीन वर्षांपासून पीडितेचे शोषण सुरू ठेवले होते.
या प्रकरणाला आता राजकीय रंग चढला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरात याची ‘पाद्यपूजा’ (पाय धुणे) करत असल्याचा एक जुना व्हीडीओ समाजमाध्यमावर प्रसारित झाला आहे. हा व्हीडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. ज्या आयोगाकडे महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे, त्याच्या अध्यक्षा एका अशा भोंदूबाबाच्या संपर्कात कशा असू शकतात, असा सवाल विरोधक करत आहेत. याच प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी उडी घेतली असून त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. खरातच्या संपर्कात केवळ सामान्य महिलाच नव्हे, तर अनेक बड्या राजकीय नेत्यांच्या पत्नी आणि उच्च पदस्थ महिला अधिकारी देखील होत्या, अशी चर्र्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. रूपाली ठोंबरे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चाकणकर आपल्या पदाचा गैरवापर करून या प्रकरणातील पुरावे नष्ट करू शकतात असा आरोप त्यांनी केला आहे. अशोक खरातने केलेल्या कृत्याचा विषय हा कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा जातीचा नसून तो थेट महिलांच्या सुरक्षेशी निगडित आहे.
खरात अध्यक्ष असलेल्या संबंधित ट्रस्टवर रुपाली चाकणकर या देखील पदाधिकारी आहेत. त्यामुळेच पोलिस कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते का अशी शंका रुपाली ठोंबरे यांनी व्यक्त केली. कारण ठोंबरे यांनी वर्षभरापूर्वीच या प्रकरणाला वाचा फोडली होती. खरातच्या संबंधित सर्व ट्रस्टवर गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. जर चाकणकर यांनी राजीनामा दिला नाही तर या अन्यायाविरोधात संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे रुपाली ठोंबरे म्हणाल्या. पोलिसांनी खरातचे ५८ व्हीडीओ जप्त केले आहेत. याचा अर्थ ५८ महिलांवर अत्याचार झाला का असा होतो. जोपर्यंत रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राहतील, तोपर्यंत या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे होणार नाही. भोंदूबाबा ‘कॅप्टन’ अशोक खरातच्या महिला अत्याचार प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. या पथकाचे नेतृत्व आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा छडा अत्यंत वेगाने लागण्याची शक्यता आहे.
खरातने यापूर्वी केलेली अन्य काही कृष्णकृत्ये तसेच त्यांचे असलेले लागेबांधे एसआयटी चौकशीत उघड होण्याची शक्यता आहे. महिला अत्याचार प्रकरणानंतर खरातकडे बेकायदेशीर शस्त्रसाठा सापडल्याने त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय खरातच्या मालमत्तेचे महत्त्वाचे दस्तावेज आणि इतर काही संशयास्पद कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. पोलिस आता जप्त केलेल्या कागदपत्रांची आणि मालमत्तेची चौकशी करत असून, यामागे आणखी कोणाचे पाठबळ होते का, याचाही शोध घेतला जात आहे. भोंदूबाबाचे बलात्कार प्रकरण उघडकीस आले असून महत्त्वाचे म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर भोंदूबाबाचे पाय धुतानाचे व्हीडीओ व्हायरल झाले आहेत. महिलांना न्याय मिळवून देणा-याच जर अंधश्रद्धेला बळी पडत असतील तर ‘कुंपणच शेत खातंय’ असे म्हणावे लागेल. हे प्रकरण पौरुषाची विकृती आणि महिलांची अंधश्रद्धा या दोन्ही शरमेच्या बाबीच म्हणाव्या लागतील. अनेक भोंदूबाबा ‘बळीचे बकरे’ शोधतच असतात. ‘ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू’!

