स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्यावरील नव्या आरोपांमुळे पाथर्डीत संतापाची लाट उसळली आहे. खरातसोबत जमिनीचा व्यवहार केल्यानंतर आपला मुलगा बेपत्ता झाला असल्याचा दावा एका स्थानिक शेतक-याने केला आहे. खरातवर आधीच लैंगिक शोषण आणि जादुटोण्याच्या (अघोरी विद्या) प्रयोगांचे अनेक आरोप असून त्याची चौकशी सुरू आहे त्यातच या नव्या तक्रारीमुळे तपासाची तीव्रता अधिक वाढली आहे. नाशिकच्या पाथर्डी परिसरातील शिवाजी ढगे या शेतक-याने आरोप केला आहे की, त्यांनी खरातला आपली जमीन विकली आणि नेमक्या त्याच दिवसापासून त्यांचा मुलगा बेपत्ता आहे. ढगे म्हणाले की, आपल्या मुलावर नेमका काय प्रभाव टाकला गेला हे आपल्याला माहिती नाही मात्र जमिनीचा व्यवहार आणि मुलाचे बेपत्ता होणे या दोन्ही घटना एकाच वेळी घडल्याचा त्यांचा दावा आहे.
त्यांनी खरातवर असाही आरोप केला आहे की, त्यांनी अनेक शेतक-यांकडून पूर्ण पैसे न देता त्यांच्या जमिनी हडप केल्या आहेत. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, खरातने आपल्या सर्व जमिनींना कुंपण घातले असून तो फक्त अमावस्या आणि पौर्णिमा या विशिष्ट दिवशीच तिथे भेट देत असे. या भेटीदरम्यान दीपक लोंढे नावाचा एक एजंट अनेकदा त्यांच्या सोबत दिसायचा. ग्रामस्थांच्या आरोपांचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्यामुळे खरातभोवती तपासाचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणाच्या सर्व अंगांनी सखोल चौकशी करण्यासाठी प्रशासनावर मोठा दबाव वाढत आहे. अशोक खरात आणि त्यांचा कार्यालयीन सहकारी नीरज जाधव यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान माहिती लपवण्यावरून दोघांमध्ये पोलिसांसमोरच शाब्दिक चकमक उडाल्याचे समजते. तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाचा दुवा समोर आला आहे. नीरज जाधव याच्या कॉल डिटेल रेकॉर्डस्मधून ३० ते ४० महिलांचे संपर्क क्रमांक उघड झाले आहेत. एसआयटीने मोठी कारवाई करत खरात यांच्या ‘ईशानेश्वर’ मंदिराशी संबंधित ३ व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.
त्यामध्ये मंदिराचा पुजारी आणि दोन कर्मचा-यांचा समावेश आहे. खरात याच्या फार्महाऊसवर नेमके कोणते प्रकार चालत होते आणि कोणत्या कारणासाठी लोकांना तिथे आणले जात होते, याचा तपास अधिकारी करत आहेत. यातून श्रद्धेच्या नावाखाली नेमके काय चालले होते, याचा पर्दाफाश होऊ शकेल. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोप केला आहे की, तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी खरात यांना अवाजवी सवलती दिल्या असून या प्रकरणी जयंत पाटील यांचीही चौकशी झाली पाहिजे. एसआयटीने खरात याच्या केबिनमधून द्रव पदार्थ, ग्लास, बाटल्या आणि इतर यंत्रसामुग्रीसह मूळ पुरावे तपासासाठी जप्त केले आहेत. खरात याच्या विरोधात आणखी एका पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. मोठमोठ्या लोकांसोबत खरातचे उठणे-बसणे असल्यामुळे त्याच्यावर होणा-या आरोपांवर कुणाचा विश्वास बसला नसता; पण थेट व्हीडीओ समोर आल्याने त्याचे खरे रुप बाहेर आले. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, खरातने तिच्यावर वारंवार अत्याचार केले.
खरात अघोरी कृत्य करायचा आणि धमक्या द्यायचा. धक्कादायक बाब म्हणजे, ही पीडित महिला जेव्हा उपचारांसाठी येत असे तेव्हा खरात तिच्या पतीला बाहेर बसवून आतमध्ये ‘पूजा-विधी’च्या नावाखाली तिचे लैंगिक शोषण करत होता. भाविकांना घाबरवण्यासाठी तो नकली साप आणि वाघाच्या कातडीचा वापर करून अघोरी कृत्य करीत असल्याचा उल्लेख पीडितेने तक्रारीत केला आहे. जर या प्रकरणाची कुठेही वाच्यता केली तर पीडिता आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती. तांत्रिक विद्या अवगत असल्याचा दावा करणा-या बुवाभोवती राजकारणी लोकांची गर्दी नवी नाही. तंत्रज्ञानाऐवजी तंत्रमंत्राच्या मागे धावण्याचे प्रकार स्तंभित करणारे आहेत. एकीकडे पुरोगामी महाराष्ट्राचा अभिमान मिरवायचा आणि दुसरीकडे बुवाबाबांच्या पायावर डोके ठेवत त्यांचे उदात्तीकरण करायचे हा नेत्यांचा दांभिकपणा जनता पाहत आली आहे. खरात याला गुरू मानणा-या रुपाली चाकणकर त्याचे पाय धुतानाची प्रसारित झालेली छायाचित्रे आणि व्हीडीओ अतिशय धक्कादायक आणि लाजीरवाणे आहेत. ही छायाचित्रे एका राजकीय पक्षाचे महत्त्वाचे पद भूषवणा-या चाकणकर यांची बुरसटलेली मानसिकताच दाखवत नाही तर आपल्या अशा वर्तनामुळे ढोंगी बुवाला समाजात प्रतिष्ठा मिळते इतकीही समज त्यांना नसल्याचे स्पष्टपणे दिसते.
चाकणकर या केवळ राजकारणीच नव्हे तर अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाही होत्या. आता हे प्रकरण भोवल्याने त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले असले तरी या प्रकरणाचे गांभीर्य तसूभरही कमी होत नाही. प्रगल्भता नसलेल्या अशा महिला नेत्याला पक्षाने आजवर महत्त्वाची पदे दिलीच कशी? अशा निर्णयामुळे महिला आयोगाच्या अध्यक्ष पदासारख्या पदांना न्याय देण्याची क्षमता असलेल्या अन्य कर्तबगार महिला कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. महिलांवरील हिंसाचाराचे निर्मूलन हे महिला आयोगाने निश्चित केलेले मुख्य लक्ष्य आहे. ढोंगीपणासोबत जेव्हा लैंगिक गुन्हे करणा-या बुवांना राजकारणी शरण जातात तेव्हा ती बाब समाजाच्या दृष्टीने अधिकच गंभीर असते. देशभरात बुवा आणि राजकारण्यांची युती जनसामन्यांना मूर्ख बनवत आहे आणि जनताही आनंदाने बनत आहे. आसाराम बापू आणि राम रहिम यासारख्या बाबांचे उदाहरण आपल्यासमोर आहे. अमृत काळाची चर्चा होत असताना दुसरीकडे समाजाला शतकानुशतके मागे नेणा-या अशा घटना घडत आहेत ही दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल.
नेहमीप्रमाणे आता राजकारणी खरात प्रकरणापासून आपले अंग झटकतील आणि नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करतील. तपास पथकाने खरातला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणा-यांचे बुरखे फाडले पाहिजेत तरच अशा प्रकरणांना आळा बसू शकेल. दैवी शक्ती असल्याचा दावा करून अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. या प्रकरणात हवेत बोलण्यात काहीही अर्थ नाही. अशोक खरात हे गंभीर प्रकरण आहे. आम्हीच गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणाचा भांडाफोड केला, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात दिवसेंदिवस महिला आणि मुलींवरील अत्याचारांत वाढ होत आहे. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे त्यामुळे खरातसारखी बलात्कारी प्रवृत्ती कायमची मोडून काढायला हवी.

