37 C
Latur
Saturday, March 28, 2026
Homeसंपादकीयचाकणकरांचा राजीनामा

चाकणकरांचा राजीनामा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा खरातची पाद्यपूजा करतानाचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर चाकणकर यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर रात्री उशिरा चाकणकरांनी राजीनामा दिला. वैयक्तिक कारणाने आपण राजीनामा देत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. रुपाली चाकणकर यांनी नुकतीच पुणे ‘डीजीं’ची भेट घेतली होती. तसेच सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेतली होती. त्यानंतर रात्री उशिरा चाकणकर यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली व या भेटीत त्यांनी आपला राजीनामा त्यांच्याकडे सुपुर्द केला. नाशिकमधील महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि तथाकथित भोंदू ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

सुनेत्रा पवार यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. दरम्यान, आपण वैयक्तिक आणि स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचे चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे. रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. संवैधानिक पदावर असताना राजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तिस-या नेत्या ठरल्या आहेत. या आधी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. चाकणकर या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील श्री शिवनिका संस्थानच्या विश्वस्त सदस्य असून, त्या संस्थेचा कॅप्टन अशोक खरात हा अध्यक्ष आहे. महिलांचा लैंगिक छळ आणि बलात्काराच्या आरोपांवरून पोलिसांनी खरातला अटक केल्यानंतर मागील तीन दिवसांपासून चाकणकर चांगल्याच अडचणीत आल्या होत्या. एक वर्षापूर्वी भोंदूबाबा म्हणून खरात यांचा पर्दाफाश करणा-या स्थानिक पत्रकाराला धमकावून माफी मागायला लावल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. याशिवाय चाकणकर यांचे भोंदू खरातसोबतचे विविध फोटो आणि व्हीडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षांसह विविध स्तरांतून दबाव वाढत चालला होता.

त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसेच शिवसेना (उबाठा)नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदा घेऊन चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन चाकणकर यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. रुपाली चाकणकर यांनी भोंदू खरात प्रकरणात आपली बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी भेट घेतली होती. भेटीत फडणवीस यांनी चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रात्री उशिरा चाकणकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार, परंतु केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही, तर या प्रकरणाच्या तळाशी जाऊन पारदर्शक चौकशी करावी आणि आमदार अमोल मिटकरी म्हणतात त्याप्रमाणे अजितदादांच्या अपघाताशी या भोंदूबाबाचे कनेक्शन आहे का? याचाही तपास व्हायला हवा, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर महिलांवरील अत्याचाराचे गंभीर आरोप होत आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली.

अनेक राजकीय व्यक्तींचा त्याच्याशी संपर्क असल्याचे पुरावे उघड झाल्याने सत्ताधा-यांचे धाबे दणाणले आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू करण्यात आला असूनही याला अनेकजण बळी पडत आहेत. आता तर याचा संबंध अजित पवारांच्या मृत्यूशी जोडला जात असल्याने यात मोठाच ट्विस्ट आला आहे. अलिकडेच अमेरिकन न्यायालयात एपस्टीन फाईलमधील संशयितांची नावे उजेडात आल्याने जगभरात खळबळ माजली. काहीसा असाच प्रकार खरात बाबाच्याही संदर्भात दिसून येतो. त्याच्या १०० क्लिप्स सापडल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता पीडित महिला पुढे आल्यास त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावे मिळतील आणि त्यामुळे खरातभोवती घट्ट फास आवळला जाईल. परंतु राजकीय हस्तक्षेप करून हे प्रकरण दाबण्यात आल्यास त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. भोंदूबाबा खरातकडे अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी, उद्योजक मार्गदर्शन घेण्यासाठी जात होते म्हणे. म्हणजे खरातला मोठे करण्यात ही मंडळीही तितकीच जबाबदार आहे. या मंडळींमुळे इतरांचाही खरातवर विश्वास बसला. खरातने राजकारण्यांशी असलेल्या संबंधांचा फायदा घेत महिलांवर अत्याचार केले. खरात हा समाजात ‘साधू’ म्हणून वावरत होता. महिला आयोगाच्या अध्यक्षाच जर भोंदू बाबाचे पाय धुताना दिसत असतील तर महिलांनी कोणाकडून न्यायाची अपेक्षा ठेवावी? खरात दैवी शक्तीचा दावा करून, संमोहन आणि अघोरी विधींच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करत होता. त्याने संख्याशास्त्राच्या जोरावर लोकांचा विश्वास संपादन केला होता.

तो महिलांना सांगायचा म्हणे की, अपत्यप्राप्तीसाठी किंवा घरातील समस्या निवारण्यासाठी ‘योनीपूजा’ करणे अनिवार्य आहे. याच विधीच्या नावाखाली तो महिलांवर अत्याचार करायचा. काहींना तर त्याने पतीच्या जीवाला धोका असल्याचे सांगून घाबरवले आणि त्यांचे शोषण केले. अनेकदा तो महिलांशी बनावट लग्न लावून त्यांना आपल्या जाळ्यात ओढत असे. गत १५ वर्षांत त्याने सुमारे २०० कोटींहून अधिकची माया जमवल्याचे सांगण्यात येते. त्याने स्वत:च्या पत्नी आणि मुलीच्या नावेही कोट्यवधींच्या जमिनी घेतल्या आहेत म्हणे. सध्या पोलिस त्याच्या आर्थिक व्यवहाराची आणि त्याच्याशी संबंधित इतर बड्या व्यक्तींची चौकशी करत आहेत. त्याच्या संपर्कात असलेल्या सर्व मंत्र्यांचे आणि त्यांच्या निकटवर्तीयांचे कॉल डिटेल रेकॉर्डस् (सीडीआर) तपासले जावेत. अफाट संपत्ती जमवणा-या खरातला मिळणारा राजाश्रय पाहता काही विशिष्ट लोकांना वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR