नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतातील तरुणांचा अचानक मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याच दरम्यान दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांनी केलेल्या संयुक्त रिसर्चमधून महत्त्वाची माहिती मिळाली आहे.
आम्ही तरुणांमध्ये अचानक मृत्यू होण्याच्या मुख्य कारणांचे विश्लेषण केले आणि असे आढळले की, हार्ट अटॅक हे यामागचे मुख्य कारण आहे. जेव्हा कोरोनरी धमन्या ब्लॉक होतात तेव्हा हृदयाचे सामान्य कार्य थांबते, ज्यामुळे अचानक मृत्यू होतो असे डॉ. अरवा यांनी म्हटले आहे. हा रिसर्च वर्षभर चाललेल्या अभ्यासावर आधारित होता आणि त्याचे निकाल आयसीएमआर जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. रिसर्चमध्ये असेही स्पष्ट केले गेले आहे की, आतापर्यंत भारतात अशा कोणत्याही अचानक मृत्यूचे डॉक्युमेंटेशन झालेले नाही, मात्र एम्समध्ये केलेल्या रिसर्चमध्ये त्यांचे डॉक्युमेंटेशन करण्यात आले आहे.
तरुणांमध्ये अचानक मृत्यू होण्याची इतर संभाव्य कारणे स्पष्ट करताना, डॉ. अरवा म्हणाले की, जीवनशैली हे एक प्रमुख कारण असू शकते. आज तरुणांमध्ये जास्त प्रमाणात मद्यपान, अनियमित खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव दिसून येत आहे, ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. आपल्याला आपली जीवनशैली सुधारण्याची गरज आहे. डॉ. अरवा पुढे स्पष्ट करतात की, अनुवांशिक विश्लेषणावर आधारित रिसर्च देखील चालू आहे आणि त्याचे निकाल या समस्येचे आणखी पैलू उघड करू शकतात.
जेव्हा संशोधकांना विचारण्यात आले की, कोरोना लसीकरण आणि तरुणांमध्ये अचानक मृत्यू यांच्यात काही संबंध आहे का, तेव्हा डॉ. अरवा म्हणाले, आम्ही ही शक्यता विचारात घेतली, परंतु आमच्या रिसर्चमधून स्पष्टपणे दिसून आले की हे मृत्यू कोरोना लसीकरणाशी संबंधित नव्हते. कोरोना व्हायरसमुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
















