HomeFeaturedमहापालिकेच्या निष्काळजीपणामुळे नाल्याच्या पाण्यात बुडून ४ मुलांचा मृत्यू

महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे नाल्याच्या पाण्यात बुडून ४ मुलांचा मृत्यू

 नांदेड : सुनिल पारडे
नांदेड शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. देगलूर नाका परिसरात महापालिकेच्या वतीने नाल्याचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून ४ लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुदैर्वी घटना आज १६ एप्रिल रोजी गुरूवारी दुपारी  घडली. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड शहरात शोककळा पसरली आहे.तर मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असल्याने दुपारच्या वेळी मुले घराबाहेर खेळण्यासाठी पडली होती. कडाक्याच्या उन्हामुळे ही मुले खेळता खेळता देगलूर नाका भागातील नाल्याजवळ गेली. महापालिकेच्या वतीने या परिसरात नाल्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. या खोदलेल्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने खेळता खेळता ही मुले खड्ड्यात पडली आणि त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत मुलांमध्ये मोहम्मद अदनान मोहम्मद फिरोज वय १०, मोहम्मद अली मोहम्मद इदरीस वय १३, सय्यद इरफान सय्यद फिरोज वय १३ व आयान इब्राहिम बागवान वय ११ सर्व राहणार इस्लामपुरा यांचा समावेश असल्याचे समजते. चौघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढून शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहेत. मयत झालेली मुले ७ ते १० वर्ष वयोगटातील आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पालकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. एकाच वेळी चार चिमुरड्यांचा जीव गेल्याने नांदेड शहरारात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाल्याचे काम सुरू असताना खड्ड्यांभोवती सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नव्हती, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. महापालिकेच्या या हलगर्जीपणामुळेच निष्पाप मुलांचा जीव गेल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास केला जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR