नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतात कर्करोग ही एक गंभीर आरोग्य समस्या बनत चालली आहे. एकेकाळी वृद्धांशी संबंधित मानला जाणारा हा आजार आता तरुण आणि मध्यमवयीन लोकांनाही मोठ्या प्रमाणावर प्रभावित करत आहे.
राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, सध्याची परिस्थिती कायम राहिली तर २०४० पर्यंत भारतातील कर्करोग रुग्णांची संख्या २० लाखांपर्यंत पोहोचू शकते. हा आकडा केवळ धक्कादायक नसून देशाच्या आरोग्य व्यवस्थेसाठीही मोठा इशारा आहे. बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण, असंतुलित आहार आणि लोकसंख्येतील वृद्धांचे प्रमाण वाढत असल्याने भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
भारतामध्ये ६० वर्षांवरील लोकसंख्या वेगाने वाढत आहे. वय वाढल्यास कर्करोगाचा धोका वाढतो. अभ्यासानुसार ६० ते ७४ वयोगटात कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आढळते. लोकसंख्येचा आकार आणि वयाची रचना बदलत असल्याने एकूण रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.
सरकारी व आरोग्य संस्थांच्या अंदाजानुसार, प्रत्येक ९ पैकी एका भारतीयाला आयुष्यात कधी ना कधी कर्करोग होण्याची शक्यता आहे. यावरून हा आजार आता कोणत्याही एका वयोगटापुरता किंवा वर्गापुरता मर्यादित राहिलेला नाही, हे स्पष्ट होते. डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, देशातील जवळपास प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कर्करोग उपचार सुविधा विकसित केल्या जात आहेत. कर्करोगाचे उपचार कमी खर्चात किंवा मोफत उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्याने एक व्यापक राष्ट्रीय योजना राबवली जात असून, कर्करोगाचा वाढता धोका रोखण्यासाठी बहुआयामी उपाययोजना केल्या जात आहेत.
















