अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या एका कृतीने जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेतील रेडिओ होस्ट मायकेल सॅव्हेज यांचे एक पॉडकास्ट सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पॉडकास्टमध्ये भारत, चीन आणि इतर काही देशांचा उल्लेख ‘नरक’(हेल-होल्स) असा करत अत्यंत आक्षेपार्ह आणि वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली आहे. अमेरिकेतील जन्मसिद्ध नागरिकत्व कायद्यात बदल करण्याच्या मागणीवरून हा नवा वाद उफाळून आला आहे. मायकेल सॅव्हेज यांनी आपल्या ‘सॅव्हेज नेशन’ या कार्यक्रमात दावा केला की, भारत आणि चीनमधील लोक केवळ मुलाला जन्म देण्यासाठी अमेरिकेत येतात. अमेरिकेच्या सध्याच्या कायद्यानुसार, तिथे जन्मलेले बाळ तात्काळ अमेरिकन नागरिक बनते. सॅव्हेज यांनी या स्थलांतरितांचा उल्लेख ‘लॅपटॉप घेऊन फिरणारे गँगस्टर’ असा केला असून, त्यांनी अमेरिकेचा अपमान केल्याचा आरोपही केला आहे. ‘या लोकांनी माफिया कुटुंबापेक्षाही जास्त नुकसान अमेरिकेचे केले आहे’ असे अजब तर्क सॅव्हेज यांनी या पत्रात मांडले आहेत.
सॅव्हेज यांनी केवळ देशाचाच अपमान केला नाही, तर भारतीय स्थलांतरितांवरही निशाणा साधला आहे. कॅलिफोर्नियातील हाय-टेक कंपन्यांमध्ये आता पांढ-या व्यक्तीला नोकरी मिळणे अशक्य झाले आहे, कारण तिथली सर्व यंत्रणा आता भारतीय आणि चिनी लोक चालवत आहेत, असे म्हणत त्यांनी नोक-यांच्या मुद्यावरून विषारी टीका केली आहे. ट्रम्प यांनी ही वर्णद्वेषी पोस्ट त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवर शेअर केल्याने त्याला अधिकृत पाठबळ मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जानेवारी २०२५ मध्ये दुस-यांदा सत्तेत आल्यानंतर लगेचच जन्मसिद्ध नागरिकत्व बंद करण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली होती. ट्रम्प यांचा असा दावा आहे की, जगातील कोणत्याही देशात अशा प्रकारचा कायदा नाही. मात्र, हा दावा तांत्रिकदृष्ट्या चुकीचा आहे, कारण कॅनडा आणि मेक्सिकोसह जगातील सुमारे ३६ देशांमध्ये हा कायदा आजही अस्तित्वात आहे. सध्या हा संपूर्ण विषय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ट्रम्प यांनी या प्रकरणावर भाष्य करताना म्हटले की, जर न्यायालयाने आमच्या विरोधात निकाल दिला, तर त्यामुळे अमेरिकेचे केवळ आर्थिक नुकसानच होणार नाही तर देशाची प्रतिष्ठाही धुळीला मिळेल. आता न्यायालयाचा निकाल काय येतो आणि भारत-चीन सारख्या देशांबद्दल केलेल्या या विधानाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर काय पडसाद उमटतात, ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनचा उल्लेख ‘नरक’ असा करणा-या एका पॉडकास्टला सोशल मीडियावर प्रसिद्धी दिल्यानंतर दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र, हा वाद अधिक वाढू नये यासाठी अमेरिकन प्रशासनाने तातडीने हालचाली करत ‘डॅमेज कंट्रोल’ सुरू केले आहे. अमेरिकन दूतावासाने भारताचे कौतुक करत हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला असून, भारतानेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांच्या विधानामुळे भारतात संतापाची लाट उसळल्यानंतर अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्याने परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. ‘राष्ट्राध्यक्षांनी नेहमीच म्हटले आहे की, भारत हा एक महान देश असून तिथले नेतृत्व माझे चांगले मित्र आहेत’ असे स्पष्टीकरण दूतावासाने दिले. मायकेल सॅव्हेज यांच्या वर्णद्वेषी टिप्पणीमुळे निर्माण झालेला दुरावा दूर करण्यासाठी ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. हा संपूर्ण वाद मायकेल सॅव्हेज यांच्या पॉडकास्टमुळे सुरू झाला. यामध्ये सॅव्हेज यांनी अमेरिकेतील जन्मसिद्ध नागरिकत्व कायद्यावर टीका करताना भारतीय आणि चिनी स्थलांतरितांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर भाष्य केले होते.
स्थलांतरित लोक या कायद्याचा गैरवापर करत असल्याचे सांगताना त्यांनी भारत आणि चीनचा उल्लेख ‘नरक’ असा केला होता. ट्रम्प यांनी ही पोस्ट शेअर केल्याने भारतात त्याचे तीव्र पडसाद उमटले. डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यावर काही तासांतच त्यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुलांना मिळणारे जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. मात्र, अमेरिकेतील कनिष्ठ न्यायालयाने हा आदेश असंवैधानिक ठरवून त्याला स्थगिती दिली आहे. आता हे प्रकरण सर्वाेच्च न्यायालयात असून ट्रम्प यांनी स्वत: या सुनावणीला उपस्थित राहून न्यायव्यवस्थेवर टीका केली आहे. एकीकडे अमेरिका-इराणमध्ये युद्धाचा भडका उडाला असताना डोनाल्ड ट्रम्प आपल्या वागण्याने जगातील इतर मित्र देशांचा रोष ओढवून घेत आहेत. अमेरिकेतील रेडिओ होस्ट मायकेल सॅव्हेज यांनी अमेरिकेतील जन्मजात नागरिकत्वाच्या कायद्यावर टीका करताना भारत आणि चीनचा उल्लेख ‘पृथ्वीवरील नरक’ असा केला होता. ट्रम्प यांनी सॅव्हेज यांचा व्हीडीओ रीपोस्ट केल्याने वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना आव्हान दिले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी कटू सत्य जगासमोर मांडले आहे. यावर आता भाजपने आणि पंतप्रधान मोदींनी पत्रकार परिषद घ्यावी आणि हा देश नरक नसून नंदनवन आहे, हे सांगावे. खरं तर हा देश नंदनवन होता पण या नंदनवनाचे नरक करण्याचे काम मोदी आणि त्यांच्या सरकारने गेल्या ११ वर्षांत केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे ती पक्की माहिती आहे असे त्यावरून दिसते, असा दावा संजय राऊत यांनी केला. भारतीय-अमेरिकन काँग्रेस सदस्य अमी बेरा यांनी ट्रम्प यांच्या पोस्टवर दु:ख व्यक्त केले असून मला आपल्या वारशाचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या ट्रम्प यांना कोणत्याही गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला नाही, असे म्हणत त्यांनी ट्रम्प यांना घरचा आहेर दिला. ट्रम्प यांची वक्तव्ये आक्षेपार्ह, अज्ञानी आणि त्यांच्या पदाला न शोभणारी आहेत. एक राष्ट्र म्हणून आपण कोण आहोत याची समज त्यांना नाही. अमेरिकेत येऊन, कठोर परिश्रम करून आपल्या देशासाठी योगदान देणा-या स्थलांतरितांच्या पिढ्यांमुळे अमेरिका नेहमीच मजबूत झाली आहे, असे बेरा म्हणाले.

