अमेरिकेने इस्रायलच्या सहकार्याने इराणविरुद्ध २८ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ ही मोठी लष्करी मोहीम सुरू केली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हे युद्ध ४ ते ५ आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ चालू शकते असे संकेत दिले आहेत. या युद्धाचा अमेरिकन करदात्यांवर आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर भयानक परिणाम होणार आहे. अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’नुसार या मोहिमेत आतापर्यंत इराणमधील १ हजारपेक्षा जास्त लष्करी लक्ष्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. या मोहिमेत अमेरिकेने बी-२ स्टेल्थ बॉम्बर, एफ-३५, एफ-२२ रॅप्टर आणि टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांसारख्या महागड्या शस्त्रप्रणालींचा वापर केला आहे. या अवाढव्य लष्करी ताफ्यामुळे खर्चाचा आकडा वेगाने वाढत आहे. प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्यापूर्वीच लष्करी ताफ्याच्या हालचालीसाठी ६३० दशलक्ष डॉलर्स खर्च झाले. एका वृत्तसंस्थेच्या मते ऑपरेशनच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेने सुमारे ६४०० कोटी रुपये खर्च केले. हा खर्च २०२६ च्या एकूण संरक्षण बजेटच्या ०.१ टक्के इतका आहे. पर्शियन गल्फमध्ये दोन विमानवाहू युद्धनौका तैनात आहेत. एका युद्धनौकेचा रोजचा खर्च ६.५ दशलक्ष डॉलर्स आहे. म्हणजे दोन्ही नौकांसाठी दररोज १३ दशलक्ष डॉलर्स खर्च होत आहेत.
या युद्धाचा अमेरिकेवर होणारा थेट लष्करी भार ४० ते ९५ अब्ज डॉलर्सच्या दरम्यान असू शकतो. केवळ लष्करी खर्चच नाही, तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला होणारे एकूण नुकसान ११५ अब्ज ते २१० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे सरकारी खर्च आधीच जीडीपीच्या १२२.८ टक्क्यांवर पोहोचले असताना, हे युद्ध अमेरिकेची आर्थिक स्थिती अधिक बिकट करू शकते. या युद्धाचा सर्वांत मोठा आणि तातडीचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर झाला आहे. इराणने ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ बंद केल्याने कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. बें्रट क्रूड तेलाचे दर प्रति बॅरल ८०.८९ डॉलर्सवर पोहोचले आहेत. जर संघर्ष लांबला तर हा दर १५० डॉलर्सपर्यंत जाऊ शकतो. सौदी अरेबियातील सर्वांत मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर झालेला ड्रोन हल्ला आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे डिझेलच्या किमतीत ८.३ टक्के आणि गॅसोलीनच्या किमतीत ३.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. इंधनाच्या वाढत्या किमती, जहाजांचा वाढलेला विमा खर्च आणि लष्करी साहित्याचा अफाट वापर यामुळे अमेरिकेला हे युद्ध अत्यंत महाग पडणार हे स्पष्ट आहे.
जगातील बड्या खासगी तेल शुद्धीकरण कंपन्यांपैकी एक असलेल्या सौदी अरेबियातील अरामको रिफायनरी या कंपनीवर इराणने ड्रोन हल्ला केला. त्यात कंपनीत आग लागल्याने तेल पुरवठा ठप्प झाला आहे. याचा परिणाम अनेक देशांवर होणार आहे. हीच अरामको कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू किंवा सोयगाव येथे तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारणार आहे. प्रथम हा प्रकल्प नाणार येथे उभारण्यात येत होता. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प नाणारमधून हलवण्यात आला. त्यानंतर तो बारसूला हलवण्याचा निर्णय झाला. तेथेही कडाडून विरोध झाला. इराण दोन दिवसांत शरणागती पत्करेल असा अमेरिकेचा अंदाज होता पण युद्ध सुरू होऊन चार दिवस झाले तरी इराणने माघार घेतली नाही. उलट चीन, ब्रिटन आणि स्पेनने इराणला पाठिंबा जाहीर केला आहे. आमच्या हवाई हद्दीतून जायचे नाही, असे स्पेनने अमेरिकेला बजावले आहे. त्यामुळे हे युद्ध दीर्घकाळ सुरू राहणार हे स्पष्ट आहे.
याचा थेट परिणाम तेलाच्या पुरवठ्यावर होणार आहे. तेलाचे भाव वाढत आहेत. भारताला तेलपुरवठ्याची अडचण निर्माण झाली असून आता पुन्हा रशियाकडून तेल घ्यावे काय यावर विचार करावा लागणार आहे. आता अमेरिकाही कोंडीत सापडला आहे. इस्रायलच्या मदतीसाठी अमेरिकेने सौदी अरेबियात अनेक ठिकाणी हवाई आणि नौदल तळ उभारून तेथे लढाऊ विमाने आणि जहाजे आणून ठेवली होती. मात्र इराणने त्यावरच हल्ले करून अमेरिकेचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. आपले तळ उद्ध्वस्त झाल्याने इराणवर हल्ला करण्यासाठी शस्त्रास्त्रे नाहीत हे ट्रम्प यांनी कबूल केले आहे. अमेरिकन तळांवर इराणने केलेले हल्ले इतके ताकदवान होते की, अखेर अमेरिकेला तेथील सैनिकांना माघारी बोलवावे लागले. जॉर्डन, बहारीन येथील अमेरिकी दूतावासावर हल्ले झाल्याने अमेरिकेने तेथील अधिका-यांना परतण्यास सांगितले. कितीही दिवस लढावे लागले तरी आम्हालाच यश मिळेल आणि त्यामुळे जग सुरक्षित होईल असे अमेरिकेने म्हटले आहे.
इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांना ठार मारल्याचा बदला घेण्यासाठी इराणने पवित्र जेरूसलेम शहरावरही विध्वंसक हल्ला केला. यहुदी, मुस्लिम आणि ख्रिश्चनांसाठी जेरूसलेम हे पवित्र शहर आहे. इराण आक्रमण करीत असताना इस्रायलनेही इराणवर हल्ले सुरूच ठेवले. इस्रायलने ओमान खाडीत ११ इराणी जहाजे नष्ट केली. नतांज अणुकेंद्रावर पुन्हा हल्ला केला. हिजबुल्लाहचा गड असलेल्या बैरूतवर क्षेपणास्त्रे डागली. तेहरान शहरातील प्रशासकीय व रहिवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. दरम्यान,भारताने वेगवान हालचाली करत दुबई व इतर राष्ट्रांत अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी एअर इंडिया, इंडिगो, स्टार अलायन्सची विमाने पाठवली. या पर्यटकांचे भारतात आगमन सुरू झाले आहे. आखाती प्रदेशात सुमारे १ लाख भारतीय आहेत. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि आखाती देशांमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या किमतीत अभूतपूर्व वाढ होताना दिसत आहे. भारतात सोन्याचा भाव दोन लाखाच्या वर जाईल असा अंदाज आहे.
युद्ध परिस्थिती अधिकच चिघळली तर सोने दोन लाख पार जाताना दिसू शकेल. राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार शेअर बाजाराऐवजी सोन्याला सुरक्षित मानत आहेत. जगातील विविध देशांच्या मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा करत आहेत. त्यामुळे पुरवठा कमी आणि मागणी जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण भारतीय ग्राहकांसाठी सोने अधिक महाग करत आहे. जागतिक स्तरावर आर्थिक मंदी येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. जगातील तेलवाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी इराणने बंद केल्याने त्याचा मोठा फटका तेलपुरवठ्याला बसला आहे. त्यामुळे इंधनाचे भाव भडकण्याची शक्यता आहे. पर्यायाने देशांतर्गत महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे.

