35.1 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeसंपादकीयविषारी फुत्कार!

विषारी फुत्कार!

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले, आता दुस-या टप्प्याची तयारी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात कमी मतदान झाले, मतदानाची टक्केवारी घसरली परंतु निवडणूक प्रचार घसरला नव्हता. सर्वच पक्षांनी संयमी प्रचार केला होता. एकमेकांवर ओरखडे काढले नव्हते. प्रचारकांची माथी भडकली नव्हती मात्र, उष्णतामान भडकले होते. त्याचा परिणाम मतदानावर झाला आणि मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडणे टाळले,

त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली असे म्हटले जात आहे. आता दुस-या टप्प्याला प्रारंभ झाला आहे. अजूनही उष्णतामानात फरक नाही परंतु अधूनमधून अवकाळी अस्तित्व दाखवत असल्याने थंडावा मिळतो आहे. परंतु काय झाले कोणास ठाऊक, आता प्रचारकांची माथी भडकताना दिसत आहेत. आता धार्मिक विद्वेषातून आधारित प्रचाराला सुरुवात झाली आहे. याची सुरुवात भाजप नेत्यांनी केली असून त्यात पंतप्रधान मोदी आघाडीवर आहेत. जनतेच्या कमाईवर ‘पंजा’ मारण्याचा काँग्रेसचा इरादा असून काँग्रेसच्या काळात मंगळसूत्रसुद्धा सुरक्षित नाही असा पंतप्रधान मोदींनी आरोप केला आहे. काँग्रेसने देशातील सर्वसामान्यांची संपत्ती काढून घेऊन ती अल्पसंख्याकांना देण्याचा निर्धार केला आहे असे सांगताना मोदी म्हणाले, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशातील संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचाच असल्याचे म्हटले होते. आता काँग्रेसवाले सत्तेवर आल्यावर तुमच्या संपत्तीची माहिती घेतील. तुमच्या मालकीची दोन घरे असतील तर एक घर जप्त केले जाईल, तुमच्या महिलांच्या अंगावर असलेले मंगळसूत्रही काढून घेतले जाईल आणि ही सारी संपत्ती ज्यांना जादा मुले आहेत अशा घुसखोरांना दिली जाईल असे भयानक विधान मोदींनी प्रचारसभेत केले आहे.

काँग्रेससह विरोधकांनी मोदींच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने यासंबंधात निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रारही केली आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मोदी म्हणतात तसे काहीही नाही हे मोदींना प्रत्यक्ष भेटून सांगणार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे. मोदींकडून करण्यात आलेली वक्तव्ये अवास्तव आहेत, लोकांना नाहक घाबरवणारी व त्यांच्यात भ्रम निर्माण करणारी आहेत, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. पहिल्या टप्प्यापर्यंत मोदी हे काँग्रेसचा भ्रष्टाचार आणि त्यांचा परिवारवाद याच मुद्यांच्या मर्यादेत राहिले होते. पण पहिल्या टप्प्यात भाजप युतीला मतदान टक्केवारीचा फटका बसल्यानंतर ते आता पुन्हा हिंदू-मुस्लिम या धार्मिक ध्रुवीकरणाकडे वळले आहेत असा आरोप केला जात आहे तो बहुतांशी खरा मानायला जागा आहे. अन्यथा मोदींना प्रचारसभांमध्ये असा अचानक आक्रस्ताळेपणा करण्याची गरज भासली नसती. पंतप्रधानांनी घुसखोर, जास्त मुले असलेले लोक असे शब्द वापरले आहेत, ते कोणाला उद्देशून वापरले आहेत ते वेगळे सांगण्याची गरज नाही. जास्त मुलांच्या संदर्भात म्हणाल तर खुद्द मोदींच्या घरी सहा भावंडे आहेत, अमित शहांचीही तितकीच भावंडे आहेत. मोदींची प्रचारशैली धडाकेबाज असते. आपल्या वक्तृत्वशैलीच्या जोरावर ते विरोधकांना गुंगवून टाकतात.

मोदींच्या विरोधात महागाई, बेरोजगारी, इलेक्टोरल बाँडमधील गैरव्यवहार, त्यांनी श्रीमंत उद्योगपतींवर केलेली खैरात असे मुद्दे विरोधकांनी काढले तेव्हा या मुद्यांचा रोख बदलण्यासाठी मोदींनी आपल्या वक्तव्यांनी विरोधकांना सैरभैर करून टाकले. राजकारणाच्या खेळ्या म्हणून हा प्रकार रास्त असेलही पण ते कितपत योग्य आहे याचाही विचार झाला पाहिजे. काँग्रेस महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन ते घुसखोरांना देण्याच्या विचारात आहे अशा प्रकारचे विधान पूर्णत: अवास्तव अन् अश्लाघ्य स्वरूपाचे आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात तसा उल्लेख आहे असे म्हणणे, म्हणजे तर फाजीलपणाचाच प्रकार म्हटला पाहिजे. मोदींनी काँग्रेसवर जे आरोप केले आहेत त्याला कसलाही आधार नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या काही विधानांचा टोकाचा अन्वयार्थ लावून मोदी आक्रमक झाले आहेत. देशातील जनतेचे आर्थिक, सामाजिक आणि जातनिहाय सर्वेक्षण करून ज्यांची जितकी लोकसंख्या त्यांची तितकी भागीदारी हे सूत्र काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात स्वीकारले असून गत अनेक महिन्यांपासून राहुल गांधी हा मुद्दा मांडत आहेत. मोदींच्या सत्ताकाळात समाजात आर्थिक विषमता प्रचंड प्रमाणात वाढली आहे हे अनेक अहवालांतून दिसून आले आहे.

देशातील ७० टक्के जनतेकडे जितकी संपत्ती आहे तितकी संपत्ती देशातल्या एक टक्का लोकांच्या हातात एकवटली आहे ही वस्तुस्थिती लपून राहिलेली नाही. ठराविक वर्गाच्या हातातच देशाची संपत्ती एकवटणार असेल तर उपेक्षित वर्गाला त्या संपत्तीत वाटा मिळाला पाहिजे, अशी भूमिका मांडणे याचा अर्थ लोकांची संपत्ती हिसकावून घेऊन ती जादा मुले असलेल्या घुसखोरांच्या हातात देणे असा होत नाही. एका सभेत मोदी म्हणाले की, काँग्रेसची विचारसरणी माओवादी स्वरूपाची आहे. कम्युनिस्टांनी ही विचारसरणी जोपासली होती, त्यामुळे अनेक देशांचे नुकसान झाले असे सांगत मोदींनी विरोधकांची तुलना अर्बन नक्षलींशी केली. कोणत्याही राजकीय पक्षांच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणांना विरोध करताना त्यावर तात्त्विक आक्षेप घेणे लक्षात येऊ शकते, पण त्याचा भलताच अन्वयार्थ लावून समाजात धु्रवीकरण करून अस्वस्थता निर्माण करणे हे पंतप्रधानांना शोभत नाही. पंतप्रधान मोदी निवडणूक प्रचार करताना शब्दांची, घटनांची मोडतोड करून भाषणे करत आहेत नव्हे विषारी फुत्कार सोडत आहेत. निवडणुकीचे महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवून व्यक्तिगत टीका करणारी भाषणे त्यांना खचितच शोभादायक नाहीत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR