36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रवंचित आघाडीला ५ जागांचा प्रस्ताव!

वंचित आघाडीला ५ जागांचा प्रस्ताव!

मविआतील जागावाटपाचा तिढा सुटेना, ३ जागांवरून रस्सीखेच
मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये महिनाभरापासून बैठकांचे सत्र सुरू होते. पण जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नव्हता. काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा काही जागांवर दावा होता. त्यामुळे चर्चेतून तिढा सोडवला जात होता. यात बहुतांश जागांचा तिढा सुटलेला आहे. परंतु ३ जागांवरून अजूनही दावे-प्रतिदावे सुरूच आहेत. यामध्ये दक्षिण मुंबई, सांगली आणि भिवंडी या तीन जागांचा समावेश आहे. यावरून वरिष्ठांमध्ये संवाद सुरू आहे. परंतु अद्याप यावर तोडगा निघू शकला नसल्याचे समजते. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही परिस्थितीत सोबत घेण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता त्यांना ४ ऐवजी ५ जागांचा प्रस्ताव पाठविल्याचेही समजते.

एकीकडे महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा आता थोडक्यात अडकला आहे. परंतु त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची महाविकास आघाडीची भूमिका आहे. त्यामुळे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यातच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायला आम्ही तयार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने याबाबत विचार करावा, असे म्हणून पटोले यांनी हा चेंडू थेट राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कोर्टात टाकला. त्यामुळे नव्याने प्रस्ताव देण्याचा विचार पुढे आला. त्यातून महाविकास आघाडीकडून वंचितला कालपर्यंत ४ जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. पण वंचितमुळे लोकसभा निवडणुकीत संभाव्य धोका लक्षात घेऊन वंचितला आता ५ जागांचा प्रस्ताव समोर आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला ६ जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे आता ५ जागांवर वंचित महाविकास आघाडीसोबत येणार का, हे पाहावे लागेल.

वंचितला दिलेल्या नव्या प्रस्तावानंतर महाविकास आघाडीची वेट अँड वॉचची भू्िमका आहे तर वंचितकडून मविआला ६ जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाकडून आज उमेदवारांची घोषणा करण्यात येणार होती. पण वंचितला नवा प्रस्ताव पाठवल्यानंतर ठाकरे गटाकडून आज उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार नाही. त्याऐवजी ठाकरे गट वंचितची भूमिका समोर आल्यानंतर उद्या उमेदवारांची यादी जाहीर करेल, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीत सहभागी न झाल्यास शिवसेना ठाकरे गट वेगळा उमेदवार देण्याच्या तयारी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

तीन जागांवरून तिढा?
महाविकास आघाडीत आता जागावाटपाचा तिढा संयमाने सोडवण्यात येत आहे. महाविकास आघाडीत भिवंडी, सांगली, दक्षिण मुंबईचा तिढा अद्याप कायम आहे. सांगलीच्या जागेवरती काँग्रेस आणि ठाकरे गट, भिवंडीच्या जागेवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट तर दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर कॉंग्रेस आणि शिवसेना तिढा कायम आहे. मात्र, हा तिढा सोडविण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी शरद पवार यांनी दूरध्वनीवर संवाद साधल्याची माहिती आहे. या जागांवरती निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही थेट दिल्लीतील नेत्यांशी बोला, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR