30.7 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रशिवाजी पार्कवर प्रचार सभांचा धडाका!

शिवाजी पार्कवर प्रचार सभांचा धडाका!

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्क मैदान प्रचार सभांना मिळावे, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी बीएमसीकडे अर्ज केले आहेत. एप्रिल आणि मे सभांसाठी मैदानाची मागणी राजकीय पक्षांनी केली आहे. १७ मे रोजी उद्धव ठाकरे आणि मनसेच्या राज ठाकरेंच्या सभेसाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळाव्यासाठीही अर्ज दाखल झाला आहे.

यातील अर्ज केलेल्या प्रत्येक पक्षाला परवानगी मिळेलच, असे नाही. शिवाजी पार्कवर सभेसाठी परवानगी देण्यासाठी नियम, अटी आणि दिवस या सगळ््यांचा विचार करून परवानगी दिली जाते. एकाच तारखेला जर दोन पक्षांनी अर्ज केले असतील तर ज्या पक्षाने पहिल्यांदा अर्ज केला आहे, त्या पक्षाला परवानगी दिली जाते. या सभांसाठी शिंदे गटाच्या शिवसेनेने सर्वाधिक अर्ज केले आहेत. यासोबतच भाजपकडून २३, २६ आणि २८ एप्रिल रोजी हे मैदान मिळावे, म्हणून अर्ज करण्यात आला आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडूनही २२, २४ आणि २७ एप्रिल रोजी शिवाजी पार्क सभांसाठी मिळावे, म्हणून अर्ज करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने शिवाजी पार्क येथे सभा घेण्यासाठी तिन्ही पक्षांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त वेळा महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला शिवाजी पार्कचे मैदान उपलब्ध होणार आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून १२ ऑक्टोबर रोजीच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे, असा अर्ज मुंबई महापालिकेकडे करण्यात आला. दरवर्षी शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून या मैदानासाठी अर्ज केला जातो. त्यावरून दोन्ही गटामध्ये वादही निर्माण झाल्याचे दिसून येते. शिवसेनेतील फुटीनंतर गेल्या दोन वर्षांपासून शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होत आहे तर शिंदे गटाकडून वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये घेण्यात येत आहे. त्यामुळे आता शिंदे गटाने आधीच हे मैदान बुक केल्याचं दिसत आहे. आगामी दसरा मेळाव्यासाठी आधीच अर्ज दाखल करून ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

शिंदे गटाकडून
सर्वाधिक अर्ज
एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात लोकसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यासाठी शिवाजी पार्क आपल्या सभांसाठी मिळावे, यासाठी आतापासूनच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. शिवसेना शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसांसाठी १६, १९, २१ एप्रिल रोजी सभा घेण्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे, म्हणून अर्ज केला आहे तर ३ मे, ५ मे, ७ मे रोजीही निवडणूक प्रचार सभेसाठी हे मैदान मिळावे, म्हणून शिंदे गटाने अर्ज केला आहे.

राज, उद्धव ठाकरे यांची
एकाच दिवशी मागणी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी १७ मे रोजी मैदान मिळावे, यासाठी मनसेने महापालिकेकडे अर्ज केला आहे तर त्याच दिवशी आपल्याला मैदान मिळावे, म्हणून शिवसेना ठाकरे गटानेही अर्ज केला आहे. त्यामुळे १७ मे रोजी कुणाच्या सभेसाठी परवानगी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR