Homeमहाराष्ट्रसुनेत्रा पवारांनी घेतली राजकीय रणनीतीकारांची भेट

सुनेत्रा पवारांनी घेतली राजकीय रणनीतीकारांची भेट

जिजाई बंगल्यावर तासभर खलबते

पुणे : प्रतिनिधी
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या दोन मुलांसह राजकीय रणनीतीकार नरेश अरोरा यांच्याशी सल्लामसलत केली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीपुढे उभ्या राहिलेल्या विविध आव्हानांच्या पार्र्श्वभूमीवर ही भेट असल्याची चर्चा आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, अजित पवारांचे कुटुंबीय व नरेश अरोरा यांच्यात शुक्रवारी जवळपास तासभर चर्चा झाली. पार्थ पवार, जय पवार व नरेश अरोरा यांच्यात प्रथम पुण्यातील जिजाई बंगल्यावर एक तास चर्चा झाली. त्यानंतर या तिघांनीही पुण्यातील सर्किट हाऊसवर जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. तिथेही या चौघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या चर्चेचा अधिकृत तपशील समजू शकला नाही. पण ही चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण तथा राज्यातील विद्यमान राजकीय घटनाक्रमाशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे.

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पक्षाची सर्व सूत्रे सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहेत. त्यामुळे त्या अजित पवारांच्या पावलावर पाऊल टाकत राजकीय रणनीकार नरेश अरोरा यांचे मत लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्याच्या विचारात असल्याचा दावा केला जात आहे.

सुनेत्रा पवारांनी घेतला पहिला जनता दरबार
दुसरीकडे, सुनेत्रा पवारांनी आज बारामतीत पहिल्यांदाच जनता दरबार घेतला. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्यापुढे आपल्या समस्या मांडल्या. त्यावर सुनेत्रा पवार यांनी प्रशासकीय अधिका-यांना योग्य त्या सूचना केल्या. सुनेत्रा पवार यांची आता बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी नियुक्ती होणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. हे पद अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झाले आहे. याशिवाय अजित पवार ज्या-ज्या संस्थांच्या अध्यक्ष किंवा संचालक पदावर होते, त्या ठिकाणी जय किंवा पार्थ पवार अथवा इतर कुणाची नियुक्ती करायची याचा निर्णय पवार कुटुंबीय एकत्र बसून घेणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR