28.8 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeसंपादकीय विशेषसुसंस्कृत आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व

सुसंस्कृत आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व

मुख्यमंत्री, लोकसभा सभापती आणि शिवसेना नेते म्हणून मनोहर जोशी यांनी मराठी माणूस, मराठी भाषा, हिंदुत्व आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आयुष्य वेचले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. सौम्य शब्दांतूनही आपण आपला विरोधातील विचार मांडू शकतो हा सरांचा गुणविशेष मला नेहमीच महत्त्वाचा वाटत आला. सातत्याने शिवराळ भाषा वापरणे, एकमेकांवर चिखलफेक करणे यापासून सर नेहमीच दूर राहिले. त्यामुळेच आजही आम्हाला ते आदर्श वाटतात.

वसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्याशी जवळपास ३५ वर्षांपासून माझे स्नेहबंध होते. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्याआधीपासून माझा त्यांच्याशी परिचय होता. त्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, लोकसभेचे अध्यक्ष, शिवसेनेचे नेते म्हणून सातत्याने त्यांचे मार्गदर्शन मला लाभले. जोशी सर हे अत्यंत अभ्यासू, सुसंस्कृत आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्यातील समयसूचकता विशेष उल्लेखनीय होती. मुख्यमंत्री असतानाच्या काळात प्रशासनावर त्यांची पकड होती. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे एक अनुयायी, एक सैनिक या नात्याने त्यांनी हळूहळू राजकारणामध्ये प्रमुख पदाची भूमिका घेतली होती. शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात त्यांची नोंद राहील. तत्पूर्वी १९७६ मध्ये त्यांनी मुंबईचे महापौरपदही भूषविले.

शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील युतीदरम्यान काही प्रश्न निर्माण झाले, समस्या निर्माण झाल्या तर त्या सोडवण्यावरही त्यांचा भर असायचा. मला आठवतंय, २०१४ मध्ये जेव्हा भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये युती होण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते तेव्हा ते मला म्हणाले होते की, माझ्याकडे चर्चेची जबाबदारी द्या, मी पाच मिनिटांमध्ये युती करून दाखवतो. राजकारणातील आणि पक्षातील, युतीतील इतक्या वर्षांच्या अनुभवांमधून, निरीक्षणांमधून कुणाचा स्वभाव कसा आहे, याची त्यांना पूर्णत: जाण होती. स्त्री आधार केंद्राच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सरांची उपस्थिती राहिली होती. त्यावेळी महिलांच्या प्रश्नांसंदर्भात मी करत असलेल्या कार्याबाबत त्यांचे मार्गदर्शनही मला लाभले. महिलांसाठी स्वतंत्र न्यायालय, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या सैनिक शाळा, बचत गटांना चालना आणि महिला आरक्षणाबद्दलसुद्धा त्यांनी अनुकूल भूमिका घेतली होती.

जोशी सरांची एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते. ती म्हणजे २००२ ते २००४ या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष होते. तेव्हा पुण्यातील टिळक स्मारक मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी आज ना उद्या महिलांना आरक्षण मिळेल, अशी इच्छा व्यक्त केली होती. इतकेच नव्हे तर त्यांच्या आधिपत्याखाली विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांना एक तृतीयांश आरक्षणाचा ठराव एकमताने मंजूर झाला होता. महिला धोरणासंदर्भातील कृतिकार्यक्रमही त्यांनी घेतला होता. सरसेनापती स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार जोशी सरांची संपूर्ण कृती होती. त्यांचे संघटन कौशल्य आणि तळागाळातील संपर्कासाठी ओळखले जात होते.

श्रद्धा आणि सबुरी ही जोशी सरांची दोन ब्रीदवाक्ये होती. यापैकी सबुरी ठेवणे हा मूलमंत्र आयुष्यभर त्यांनी जपला. त्याच वेळेला ते कामामध्ये कुठेही कमी पडले नाहीत. गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांची प्रकृती फारशी चांगली नव्हती. अनेक आजारांनी ते ग्रस्त होते. परंतु तरीही शिवसेनेच्या कार्यक्रमांवर त्यांचे अत्यंत चाणाक्ष लक्ष होते. मधल्या काळात शिवसेनेसह एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडल्या. पण यादरम्यान त्यांनी कधीही पक्षादेशाचा भंग केला नाही. राजकीय मतभेदांपोटी त्यांना अनेकदा उपेक्षा आणि अवमानदेखील सहन करावा लागला.
बाळासाहेबांच्या सोबत राहिल्यामुळे त्यांच्या विरोधातही काहीसे वातावरण होते.

त्यांची जागा घेण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू होते. पण मला वाटतं राजकारणात या सर्व गोष्टी घडत असतात. परंतु मराठीचा अभिमान, हिंदुत्वाचा विचार आणि विकासाचा ध्यास हे जोशी सरांच्या राजकीय कारकीर्दीतील महत्त्वाचे आयाम राहिले. १९९६ मध्ये स्थापन झालेल्या कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कृषीअर्थकारणाला, सिंचनाला आणि पर्यायाने समाजकारणाला मिळालेला आधार आपल्याला कदापि विसरता येणार नाही. विशेष म्हणजे ज्या पश्चिम महाराष्ट्राने शिवसेनेला कौल दिलेला नव्हता त्यांच्यासाठीसुद्धा शिवसेनाप्रमुखांचे जे उदार अंत:करण होते त्याच्या अंमलबजावणीचे शिवधनुष्य सरांनी उचलले होते. महिला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मला त्यांचे सहकार्य लाभले. विधान परिषद आमदारकीच्या वेळीही त्यांचे आशीर्वाद मला लाभले. तसेच विधानसभा अध्यक्ष बनल्यानंतरच्या काळातही सरांचे सातत्याने मार्गदर्शन मला लाभले.

राजकारण असो, समाजकारण असो वा कोणतेही क्षेत्र असो त्या क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांच्या जाण्यानंतर एक प्रमुख प्रश्न आपल्याला पडतो की आपण या व्यक्तिमत्त्वांच्या सहवासातून काय शिकलो? या परिप्रेक्ष्यातून जोशी सरांबाबत सांगायचे झाल्यास सौम्य शब्दांतूनही आपण आपला विरोधातील विचार मांडू शकतो हा एक महत्त्वाचा गुणविशेष मला शिकता आला. सातत्याने शिवराळ भाषा वापरणे, एकमेकांवर चिखलफेक करणे यापासून सर नेहमीच दूर राहिले. त्यामुळेच आजही आम्हाला ते आदर्श वाटतात. त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहताना आम्हा सर्वांचा एक हक्काचा मार्गदर्शक हरपल्याचे दु:ख मनात आहे. सरांच्या निधनाने सुसंस्कृत नेत्याला महाराष्ट्र आणि देश मुकला आहे. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.

(शब्दांकन : हेमचंद्र फडके)
-डॉ. नीलम गो-हे,
विधान परिषदेच्या उपसभापती

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR